दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आज (गुरुवार) दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान व ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. ( Pakistan face Australia in the second semi-final in Dubai ) या सामन्यातील विजयासह स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. मात्र, तरीही फलंदाजी व गोलंदाजीतील बलाबल पाहता ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड राहणार आहे.
पाकिस्तान विरूध्द ऑस्ट्रेलिया या दुसऱ्या उपांत्य सामन्यास थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा (टाॅस) कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागलेला आहे. ( Australia have won the toss and elected to field against Pakistan ) कर्णधार अॅरनं फिंच याने क्षेत्ररक्षण स्विकारताना पाकिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
दरम्यान, कालच न्यूझीलंडने आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीतील रोहमहर्षक लढतीत इंग्लंडचा 5 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आजच्या उपांत्य सामन्यातील विजेता संघ येत्या 14 नोव्हेंबरला न्यूझीलंड संघा विरूध्द विजेतेपदासाठी खेळेल.
यंदाच्या स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून पाकिस्तानने सलग विजय मिळवले आहेत. मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यानंतर त्यांचे फलंदाजीतील सातत्य कमी झाले. तसेच गोलंदाजीतही त्यांना ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पाहता खूप कटाक्षाने कामगिरी करावी लागणार आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ पाहिला तर त्यांच्याकडे फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तिनही क्षेत्रात बलाढ्य खेळाडूंचा भरणा आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून अपयशी ठरलेला सलामीवीर डेव्हीड वॉर्नर भरात आल्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांना त्याला रोखण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.