शारजा – आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील सुपर 12 फेरीतील लढतीत पाकिस्तानने स्कॉटलंडचा 72 धावांनी पराभव केला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 190 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडच्या फलंदाजांनीही जिद्दी वृत्तीचे दर्शन घडवले. मात्र, त्यांचा अनुभव कमी पडला व त्यांचा डाव 20 षटकांत 6 बाद 117 धावांवर रोखला गेला व पाकिस्तानने विजय प्राप्त केला. स्कॉटलंडकडून रिची बॅरिंगटनने दमदार नाबाद अर्धशतकी खेळी केली.
पाकिस्तानने स्कॉटलंडसमोर विजयासाठी 190 धावांचे आव्हान ठेवले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानने 20 षटकांत 4 गडी गमवून 189 धावांचा डोंगर उभा केला. बाबरने महंमद रिझवानसह डावाची सुरुवात केली. रिझवान 15 धावांवर बाद झाला.
महंमद हफीजने 19 चेंडूत 4 चौकार व 1 षटकाराच्या मदतीने 31 धावांची खेळी केली. बाबरने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. त्याने 47 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत 66 धावा केल्या. मलिकने 18 चेंडूत 1 चौकार व 6 षटकार फटकावताना नाबाद 54 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान – 20 षटकांत 4 बाद 189 धावा. (महंमद हाफिज 31, बाबर आझम 66, शोएब मलिक नाबाद 54, असीफ अली नाबाद 5, ख्रिस ग्रीव्हज 2-43, हमजा ताहिर 1-24, शफियान शरीफ 1-41). स्कॉटलंड – 20 षटकांत 6 बाद 117 धावा. (रिची बॅरिंगटन नाबाद 54, शादाब खान 2-14).