दुबई | पाकिस्तानकडून पराभव झाल्यावर सोशल मीडियावर भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी याच्यावर अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका झाली. त्यामुळे शमीनेदेखील नाराजी व्यक्त केली.
शमीच्या कामगिरीबद्दलही शंका उपस्थित करण्यात आल्या. त्याने गोलंदाजीत अत्यंत सुमार कामगिरी केल्यामुळे त्याच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत भारतीय संघाच्या चाहत्यांनी शमीलाच लक्ष्य केले.
शमीच्या समर्थनार्थ वीरेंद्र सेहवागसह अनेक आजी-माजी क्रिकेटपटू पुढे आले. केवळ पराभवाचे खापर एखाद्या खेळाडूवर फोडले जाणे योग्य नाही. शमीने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. अशा एखाद्या सामन्यातील सुमार कामगिरीमुळे त्याला टीकेचे लक्ष्य बनवले जाणे खेदजनक आहे. येत्या काळात शमी या अपयशातून सावरून संघाला पुन्हा विजयाच्या मार्गावर आणेल, असा विश्वास सेहवागने व्यक्त केला आहे.
सेहवागसह इरफान पठाण, गौतम गंभीर यांनीही शमीवरील टीकेचा निषेध केला आहे. भारताचे प्रतिनिधित्व करत असलेल्या खेळाडूवर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली जाणे अत्यंत निराशाजनक असल्याचे मत पठाणने व्यक्त केले आहे. गंभीरनेही टीकेकडे लक्ष न देता शमीने पुढील सामन्यावर लक्ष केंद्रीत करावे, असा सल्ला दिला आहे.