#T20WorldCup #INDvAUS | भारताचा आज ऑस्ट्रेलियाशी सराव सामना

दुबई – विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेदरम्यान इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात अफलातून विजय मिळवला. आता त्यामुळे आत्मविश्‍वास उंचावलेला कोहलीचा संघ बुधवारी ऑस्ट्रेलियाशी दुसरा सराव सामना खेळणार आहे.

पहिल्या सामन्यात खुद्द कोहलीला सरस कामगिरी करण्यात अपयश आले होते. सलामीवीर लोकेश राहुल व इशान किशन यांनी तुफानी फटकेबाजी करत इंग्लंडच्या मोठ्या धावसंख्येच्या आव्हानातील हवाच काढून टाकली होती. या सराव सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला असला तरीही काही प्रश्‍न निर्माण झाल्याचेही पाहायला मिळाले. भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी, जसप्रीत बुमराह व राहुल चहर यांनी सुमार गोलंदाजी करत इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्याची संधी दिली. केवळ ऑफ स्पिन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विनने सरस गोलंदाजी केली.

रविवारपासून भारतीय संघाचे मुख्य सुपर 12 फेरीचे सामने होणार असून त्याच दिवशी भारताचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघाला गोलंदाजीतील अपयश दूर करण्यासाठी जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे.

तसेच इंग्लंडविरुद्धच्या ज्यांना खेळायला संधी मिळाली नाही त्यांना संधी देण्याचाही प्रयोग राबवावा लागणार आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पहिल्या सराव सामन्यात विजय खेचून आणला होता त्यामुळे त्यांच्या फलंदाजांना रोखण्याचे काम भारताच्या गोलंदाजांना करावे लागणार आहे.

धोनीशी शास्त्रींची चर्चा

बेस्ट फिनिशर व सध्याचा भारतीय संघाचा मेंटॉर महेंद्रसिंह धोनी याच्याशी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सराव सत्रादरम्यान संवाद साधला. यावेळी धोनीच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सराव केला तसेच त्यानंतर संपूर्ण संघाने धोनीशी चर्चाही केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.