अबुधाबी – जोस बटलरची दमदार अर्धशतकी खेळी व त्यानंतर मार्क वूड आणि आदिल रशिद यांच्या अफलातून गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने सराव सामन्यात न्यूझीलंडवर अवघ्या 13 धावांनी विजय मिळवला.
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत इंग्लंडला प्रथम फलंदाजी दिली. बटलरने आक्रमक 73 धावांची खेळी केली. त्याने 51 चेंडूंचा सामना करताना 11 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली.
जॉनी बेअरस्टोने 30 तर, सॅम बिलिंग्सने नाबाद 27 धावा करत संघाच्या धावसंख्येत भर घातली. इंग्लंडचा डाव 20 षटकांत 6 बाद 163 असा रोखला गेला. न्यूझीलंडकडून इश सोधीने 3 गडी बाद केले.
न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टीलने इंग्लंडच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. गुप्टील 41 धावांवर बाद झाला. डेव्हन कॉनवेनेही केवळ 20 धावा केल्या. तळात इश सोधीने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही चमक दाखवताना नाबाद 25 धावा केल्या. मात्र, त्याला महत्त्वाच्या क्षणी अन्य फलंदाजांची साथ न मिळाल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.