दुबई -आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या दोन्ही संघांना आतापर्यत टी-20चे जेतेपद जिंकता आलेले नाही. 2007पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने एकदा अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
मात्र, त्यांना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. तर दुसरीकडे न्यूझीलंड प्रथमच जेतेपदासाठी मैदानात उतरणार असल्याने या सामन्याकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष लागले आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत निर्णायक विजय मिळविला होता. 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये विक्रमी पाच वेळा विश्वचषक पटकावणारा ऑस्ट्रेलिया यंदा जेतेपदावर नाव कोरण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने नेहमीच आयसीसी स्पर्धांमध्ये सातत्य ठेवले आहे. परंतु आता केन विल्यमसनच्या चतुर नेतृत्वाखाली संघाचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसत आहे.
न्यूझीलंड संघाचा हा टी-20 विश्वचषक स्पर्धेतील पहिला अंतिम सामना असला तरी ते विजयाच्या ध्येयानेच खेळणार आहे. “सुपर-12’मधील सामन्यांमध्ये न्यूझीलंडने सर्वोत्तम गोलंदाजी आणि फलंदाजीतही चमकदार कामगिरी केलेली आहे.
तसेच मार्टिन गुप्टिलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20मध्ये चांगला विक्रम केला असून त्याच्या साथीला सलामीला डॅरिल मिशेल येणार आहे. या निर्णायक सामन्यात कर्णधार केन विल्यमसनकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा आहे. केन विल्यमसन खेळल्यास ते ऑस्टेलियाविरुद्ध निर्णायक धावसंख्या उभारू शकतील.
या स्पर्धेत इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जिमी नीशमने मधल्या फळीत आपले मूल्य सिद्ध केले. परंतु न्यूझीलंडला डेव्हन कॉनवेची कमतरता जाणविणार आहे. त्याच्या जागी टीम सेफर्ट खेळण्याची शक्यता आहे. गोलंदाजीत टीम साऊदी आणि ट्रेंट बोल्ट या अनुभवी वेगवान जोडीकडून ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर यांना पॉवरप्लेमध्ये शांत ठेवण्याची अपेक्षा आहे.
तिसरा वेगवान गोलंदाज आणि लेग-स्पिनर सोधीने मधल्या षटकांमध्ये प्रभावी कामगिरी केल्यास ऑस्ट्रेलियाला कमी धावसंख्येत रोखता येवू शकेल. तसेच ऍडम मिल्नेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीत लेग-स्पिनर ऍडम झम्पाने स्पर्धेत 10.91च्या सरासरीने 12 विकेट घेतल्या आहेत. त्याच्याकडून पुन्हा एकदा मधल्या षटकांमध्ये निर्णायक कामगिरी अपेक्षित आहे, तर मॅक्सवेलदेखील न्यूझीलंडच्या फलंदाजांना चकित करू शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला शेवटच्या दोन डावांमध्ये पुन्हा सुर गवसला आहे. या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात त्याच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि स्टीव्हने स्मिथ यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे, ज्यांना अद्याप स्पर्धेत प्रभाव पाडता आलेला नाही.
मार्कस स्टॉइनिस आणि मॅथ्यू वेड यांनी पाकिस्तानविरुद्ध उल्लेखनीय पाठलाग केल्यामुळे ऑस्ट्रेलिया आणखी एका क्लोज फिनिशसाठी तयार असणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता असून सामना कोण जिंकणार हे आज निश्चित होणार आहे.
संभाव्य संघ
ऑस्ट्रेलिया : ऍरन फिंच (कर्णधार), मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, स्टीव्हन स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोनिस, ऍश्टन अगर, जोश इंग्लिस, केन रिचर्डसन, मिचेल स्वीपसन, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, ऍडम झम्पा.
न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ऍस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, ऍडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, कायल जेमिसन, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅंटनर, टिम सेफर्ट (विकेटकीपर), सोधी, टिम साउदी.