उरुळी देवाची आणि फुरसुंगीत उभारणार टोलेजंग इमारती
पुणे – उरुळी देवाची येथील कचरा प्रश्न जवळपास संपुष्टात आल्याने आता येथे टोलेजंग इमारती बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी “गुजरात पॅटर्न’ राबवण्यात येणार असून, येथील सुमारे 651 हेक्टर जागेवर “नगररचना नियोजन योजना’ (टाऊन प्लॅनिंग स्कीम) राबवण्यासाठी सल्लागार नेमण्याला बुधवारी महापालिका स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी ही माहिती दिली.
गुजरातमधील “डिझाईन पॉईंट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेत सहा कंपन्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी पाच कंपन्यांनी पात्रतेच्या अटी पूर्ण केल्या. तांत्रिक आणि आर्थिक निकषांवर निविदांची छाननी करण्यात आली. त्यानुसार “डिझाईन पॉईंट कन्सल्टंट कंपनी’ने प्रति हेक्टर 15 हजार 100 रुपये या दराने भरलेली निविदा कमीत कमी किमतीची ठरली. या कंपनीला एकूण 651 क्षेत्रासाठी 98 लाख 30 हजार 100 रुपये सल्लागार शुल्क अदा करण्याला आणि करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. उरुळी देवाची येथे 110 हेक्टरवर आणि फुरसुंगी येथे 541 हेक्टरवर ही योजना राबवण्यात येणार आहे. यासाठी सल्लागार कंपनी नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करावी, असे पीएमआरडीएने महापालिकेला 6 जुलै 2019 रोजी पत्र पाठवून सांगितले होते. स्कीमसाठी जागेचा सध्याचा वापर, मूळ जागा, अंतिम भूखंडाची मालकी, सर्वेक्षण अशी कामे प्रस्तावित असून, तयार केलेला अहवाल शासनाच्या मान्यतेसाठी पाठवावा लागणार आहे.
योजनेसाठी 100 हेक्टरला 31 लाख 49 हजार 500 रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार 651 हेक्टरसाठी 2 कोटी 5 लाख 3 हजार 245 रुपये खर्च होणार आहे. त्यापैकी 2 कोटी रुपयांची रक्कम अमृत योजनेअंतर्गत केंद्र शासन देणार आहे. उर्वरीत खर्च महापालिकेने करणे अपेक्षित आहे. 1997 मध्ये पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश होऊन तिचे क्षेत्र 243.8 चौरस किलोमीटर झाले. सन 2017 मध्ये आणखी 11 गावांचा समावेश झाल्याने हे क्षेत्र 332 चौरस किलोमीटर इतके झाले. 23 गावांच्या विकास आराखड्याला शासनाने 4 एप्रिल 2012 रोजी मान्यता दिली होती.
यापूर्वी 8 प्रकल्प सन 1939 ते 1989 या कालावधीमध्ये जुन्या पुणे हद्दीमध्ये डेक्कन, गुलटेकडी, पर्वती, संगमवाडी, मंगळवार पेठ, हडपसर इंडस्ट्रिअल इस्टेट आदी ठिकाणी आठ टाउन प्लॅनिंग स्कीम राबवण्यात आल्या आहेत.