#T20WorldCup | ओमानची विजयी सलामी

पापुआ न्यू गिनीवर केली 10 गडी राखून मात

ओमान – आयसीसी टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात ओमान संघाने पापुआ न्यू गिनी (पीएनजी) संघाचा 10 गडी राखून पराभव केला व विजयी सलामी दिली.

पीएनजीने विजयासाठी दिलेले आव्हान ओमानने एकही गडी न गमावता 14 व्या षटकातच 131 धावा करत पूर्ण केले. मूळचा पाकिस्तानातील पंजाबमध्ये जन्मलेला जतिंदर सिंग आणि अकिब इलियास यांनी नाबाद अर्धशतके फटकावत संघाचा विजय साकार केला. ओमानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पीएनजीच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाच्या 2 धावा असताना त्यांचे दोन्ही सलामीवीर तंबूूत परतले. त्यानंतर लगेचच लेगा स्लाकाला बाद केले.

कर्णधार असद वाला व चार्ल्स आमिनी यांनी तिसऱ्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आमिनी 26 चेंडूत 4 चौकार व 1 षटकार फटकावून 37 धावांवर धावबाद झाला. असदने 43 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. 16 व्या षटकात ओमानचा कर्णधार झिशान मक्‍सूदने तीन बळी घेत पीएनजीच्या डावाला खिंडार पाडले. त्यानंतर पीएनजीने 27 धावांत 6 फलंदाज गमावले आणि त्यांचा डाव 20 षटकांत 9 बाद 129 धावांवर रोखला गेला. ओमानकडून झिशानने 4 बळी घेतले. बिलाल खान व के कलीमुल्लाह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.

पीएनजीने दिलेले आव्हान जतिंदर आणि अकिब या दोघांनीच पार केले व संघाला विजय मिळवून दिला. जतिंदरने 42 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांसह नाबाद 73, तर अकिबने 43 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 50 धावा केल्या.या विजयासह ओमानने दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्याशी बरोबरी केली.

टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत यापूर्वी ऑस्ट्रेलियाने 2007 सालच्या स्पर्धेत श्रीलंकेचा, तर 2012 सालच्या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने झिम्बाब्वेचा 10 गडी राखून पराभव केला होता. त्यानंतर अशी कामगिरी करणारा ओमानचा संघ तिसऱ्या स्थानी आला आहे.

संक्षिप्त धावफलक

पापुआ न्यू गिनी – 20 षटकांत 9 बाद 129 धावा. (असद वाला 56, चार्ल्स आमिनी 37, झिशान मक्‍सूद 4-20, बिलाल खान 2-16, के. कलीमुल्लाह 2-19). ओमान – 13.4 षटकांत बिनबाद 131 धावा. (जतिंदर सिंग नाबाद 73, अकिब इलियास नाबाद 50).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.