दुबई – अमिराती व ओमानमध्ये होत असलेल्या आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ दोन सराव सामने खेळणार आहे. हे सामने अनुक्रमे इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्याशी होणार आहेत.
या स्पर्धेच्या पात्रता फेरीत आठ संघ 17 ते 22 ऑक्टोबर या कालावधीत पात्रता सामने खेळणार आहेत. भारतीय संघ यजमान असल्याने त्यांना थेट प्रवेश मिळाला आहे. या स्पर्धेपूर्वी आयसीसीने सराव सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हे सराव सामने केवळ 18 व 20 ऑक्टोबर असे दोनच दिवस खेळवले जाणार आहेत.
प्रत्येक दिवशी चार सामने होतील. दुबई आणि अबूधाबी येथे एकूण 8 सामने खेळवले जातील. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघही दोन सामने स्पर्धेचा सराव म्हणून खेळणार आहे. 17 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या मुख्य स्पर्धेपूर्वी भारताच्या सराव सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार वाहिनी करणार आहे.
भारताचे सामने
18 ऑक्टोबर, सोमवार – शेख जायद स्टेडियम, अबूधाबी
भारत विरुद्ध इंग्लंड – संध्याकाळी 7:30 वाजता
20 ऑक्टोबर, बुधवार – शेख जायद स्टेडियम, अबूधाबी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – दुपारी 3:30 वाजता