सिंडिकेट बॅंकेने सादर केला चमकदार ताळेबंद

व्यवसाय 5 लाख कोटींवर; तिसऱ्या तिमाहीतील नफा 435 कोटी

पुणे – सिंडिकेट बॅंकेने तिसऱ्या तिमाहीचा चमकदार ताळेबंद जाहीर केला. बॅंकेची उलाढाल 5 लाख कोटी रुपयांवर गेली असून तिसऱ्या तिमाहीत बॅंकेला 435 कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत बॅंकेला 108 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. इतर बॅंकाची परिस्थिती तितकीशी चांगली नसताना सिंडिकेट बॅंकेने उत्तम कामगिरी केली असल्याचे ताळेबंद यावरून दिसून येते. बॅंकेचा कार्यचालन नफा 111 टक्‍क्‍यांनी वाढून 634 कोटी रुपये झाला आहे. बॅंकेच्या कासा ठेवीचे प्रमाण वाढून8.13 टक्के झाले आहे. कर्ज वसुलीच्या बॅंकेच्या प्रयत्नांना चांगले यश येत असून बॅंकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता 12.54% वरून 11.33 टक्के इतकी झाली आहे. तर निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 6.75% वरून केवळ 5.94 टक्के झाली आहे. बॅंकेचे व्याजावरील उत्पन्न वाढून 5403 कोटी रुपये इतके झाले आहे.

बॅंकेला या तिमाहीमध्ये वसूल न झालेल्या कर्जासाठी 901 हे कोटी रुपये राखून ठेवावे लागले. बॅंकेचा एकूण व्यवसाय 5,00,971 कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 7 टक्के वाढ झाली आहे. बॅंकेच्या ठेवी 2,77,368 कोटी रुपयांवर गेल्या आहेत तर कर्जपुरवठा 2,23,603 कोटी रुपयांवर गेला आहे. बॅंकेने ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता यावी याकरिता मोबाइल बॅंकिंग सुरू केली आहे. त्यामध्ये इंग्रजी आणि हिंदीसह नऊ भाषांचा समावेश केला आहे. कर्ज व्यवस्थानासाठी बॅंकेने ट्रॅकिंग व्यवस्था लागू केली आहे.

बॅंकेने रेपो दराशी कर्जाचे व्याजदर संलग्न केले आहे. त्यामुळे रिटेल आणि लघुउद्योजकांना कमी व्याजदरात कर्ज मिळणे सोपे झाले आहे. बॅंकेने जेष्ठ नागरिकांसाठी सुरु केलेल्या घरखरेदी योजनेसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. घरासाठी, लघू उद्योजकांना कर्ज देण्यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे. एटीएम आणि विविध खरेदीसाठी बॅंकेने ब्लॉकचेन टेक्‍नॉलॉजी वापरणे सुरू केले आहे. इंटरनेट बॅंकिंग अधिक कार्यक्षम व्हावी याकरिता या यंत्रणेला सिंडिकेट बॅंकेने अधिक मजबूत केले आहे. बॅंकेने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे बॅंकेला बरेच पुरस्कार मिळाले आहेत. बॅंकेच्या मुख्य माहिती अधिकाऱ्यांना हॉल ऑफ फेम पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या संघटनेने बिशारा शाखेला पुरस्कार दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.