लंडन : ग्रॅंडस्लॅम टेनिस स्पर्धेत तब्बल 20 विजेतेपद मिळवलेल्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने 18 व्या वेळी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. आजवर आठ वेळा विम्बल्डन जिंकलेला फेडरर यंदा नवव्यांदा विजेतेपद मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.
यंदाच्या विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इटलीच्या लोरेन्झो सोनेगोला 7-5, 6-4, 6-2ने पराभूत केले. 1977 सालानंतर ग्रॅंडस्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक देणारा फेडरर सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.
उपांत्यपूर्व फेरीत फेडररचा सामना रशियाच्या डॅनिल मेदवेदेव आणि पोलंडच्या ह्युबर्ट हेरकाझ यांच्यातील विजेत्याशी होणार आहे. फेडरर कारकिर्दीत 69 व्या वेळा ग्रॅंडस्लॅमच्या चौथ्या फेरीत पोहोचला होता.
सर्बियाचा नोव्हाक जोकोविच आणि ऑस्ट्रेलियाची ऍश्ले बार्टी या अग्रमानांकित खेळाडूंनी
स्पर्धेच्या अनुक्रमे पुरुष आणि महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आंद्रेस रुब्लेव्ह, कोको गॉफ, बाबरेरा क्रेजिकोव्हा आणि इशा श्वीऑनटेक यांना मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
सानिया-बोपण्णा यांचे आव्हान संपले
भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पहिलेच ग्रॅंडस्लॅम खेळत असलेला रोहन बोपण्णा या भारतीय जोडीचे स्पर्धेतील मिश्र दुहेरी गटातील आव्हान संपुष्टात आले. ब्रिटनच्या एडन मॅकह्यूज आणि एमिली स्मिथ यांनी सानिया-बोपण्णा यांना 6-3, 6-1 असे सहज पराभूत केले.