स्वित्झर्लंड – स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडररच्या गुडघ्यावर करण्यात आलेली शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून आपण लवकरच कोर्टवर परतणार असल्याचे खुद्द त्यानेच सांगितले आहे.
गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे फेडररने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली होती. त्यानंतर त्याच्या उजव्या गुडघ्यावर तब्बल तीनवेळा शस्त्रक्रिया करण्यात आली. 2020 साली झालेल्या दोन शस्त्रक्रियांनंतर फेडरर टेनिस कोर्टपासून बराच काळ दूरच होता.
फेडरर 2020 साली जालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेनंतर जवळपास एक वर्ष टेनिसपासून दूर होता. मे महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये त्याने पुनरागमन केले होते. मात्र, तिसऱ्या फेरीतील विजयानंतर त्याने चौथ्या फेरीतून याच दुखापतीने डोके वर काढल्यामुळे माघार घेतली होती. त्यानंतर तो विम्बलडनमध्येही सहभागी झाला होता.
मात्र, उपांत्यपूर्व फेरीत त्याला पराभवाचा धक्का बसला होता. गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्याला टोकियो ऑलिम्पिकमधूनही माघार घ्यावी लागली होती. आता तो लवकरच तंदुरुस्त होऊन टेनिस कोर्टवर परतणार आहे.