स्वीस बॅंकेमुळे खातेधारकांची ओळख पटणार

बर्न – स्वीस बॅंकेतील भारतीय खातेधारकांबाबत स्वचलित व्यवस्थेंतर्गत भारताला पहिल्या टप्प्याची माहिती मिळाली असून, त्याचे विश्‍लेषण सुरू आहे. यात या खातेधारकांची ओळख पटविण्यासाठी व काळा पैसा शोधण्यासाठी पुरेशी सामग्री उपलब्ध असेल, असे मानण्यात येते.

स्वीत्झर्लंडने या महिन्यात प्रथमच काही माहिती भारताला दिली आहे. बॅंक व नियामकीय संस्थांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही माहिती मुख्यत: बंद करण्यात आलेल्या खात्यांबद्दल आहे. कारवाईच्या भीतीने लोकांनी ही खाती आधीच बंद केलेली आहेत. स्वीत्झर्लंड सरकारच्या निर्देशाने तेथील सर्व बॅंकांनी माहितीचा तपशील एकत्र केला व भारताकडे सुपूर्द केला. वर्ष 2018 मध्ये एक दिवसही ज्या खात्यांवर व्यवहार झालेला आहे, अशा खात्यांचा यात संपूर्ण तपशील आहे.

या माहितीवरून या खातेधारकांवर अघोषित संपत्ती बाळगल्याचा खटला भरण्याइतपत सामग्री उपलब्ध आहे. यात जमा, हस्तांतरण, शेअर व संपत्तीच्या इतर प्रकारात गुंतवणूक केल्याची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. ही माहिती मुख्यत: आग्नेय आशियातील अनेक देश, अमेरिका, ब्रिटन, काही आफ्रिकी देश व दक्षिण अमेरिकी देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांसह व्यावसायिकांची आहे. एकेकाळी पूर्णत: गोपनीय असलेल्या स्वीस बॅंक खात्यांच्या विरोधात जागतिक स्तरावर मागील काही दिवसांत मोहीम सुरू झाल्यानंतर या खात्यांतील पैसा मोठ्या प्रमाणावर काढण्यात आला व अनेक खाती बंद झालेली आहेत. तथापि यात2018 मध्ये बंद करण्यात आलेल्या खात्यांच्या माहितीचाही समावेश आहे. याशिवाय भारतीयांच्या अशा खात्यांची माहितीही समाविष्ट आहे, जे 2018 पूर्वी बंद करण्यात आलेले आहेत. स्वीत्झर्लंड सरकार या खात्यांची माहिती लवकरात लवकर पुरवण्याच्या प्रक्रियेत आहे.

ही खाती सुटे भाग, रसायन, वस्त्र, रिअल इस्टेट, हिरे, दागिने, पोलाद आदी व्यवसायांशी संबंधित लोकांची आहेत. स्वीस बॅंकेकडून मिळालेल्या माहितीमधील विश्‍लेषणात राजकीय संबंध असलेल्या लोकांवर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. स्वीसचे एक शिष्टमंडळ मागील वर्षी भारताच्या दौर्यावर आले होते. त्यावेळी भारत व स्वीत्झर्लंड दरम्यान माहितीच्या देवाण-घेवाणीची प्रक्रिया गतिमान करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)