स्वाइन फ्लूवर वेळीच उपचार आवश्‍यक

जामखेड – स्वाइन फ्लुची लक्षणे दिसु लागल्यास रुग्णांनी तातडीने उपचार करणे गरजेचे आहे. घाबरून न जाता वेळीच उपचार केल्यास स्वाइन फ्लू संपूर्ण बरा होतो.नागरिकांनी अफवांना बळी न पडता दक्षता घेणे महत्त्वाचे आहे, असे अवहान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.युवराज खराडे यांनी केले.

जामखेड ग्रामीण रुग्णालय व पंचायत समिती आरोग्य विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने स्वाइन फ्लू विषयी नुकतीच येथील पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित करण्यात आले होती. यावेळी डॉ. खराडे बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी तथा तहसीलदार विशाल नाईकवाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील बोराडे, गटविकास अधिकारी अशोक शेळके, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, माजी सभापती डॉ.भगवान मुरुमकर, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. के. माने, डॉ. पद्मराज पाटील, बालरोग तज्ज्ञ डॉ.सुहास सुर्यवंशी,डॉ.प्रदीप कुडके, डॉ.अनिल गायकवाड, डॉ. राजेंद्र पवार, डॉ. सुर्यकांत मोरे, डॉ.फारुख शेख, डॉ. राजेंद्र लाड, डॉ. यतीन काजळे सह तालुक्‍यातील आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डॉ. खराडे म्हणाले, रुग्णास सर्दी, ताप, जुलाब व उल्टी झाल्यास तातडीने उपचार करुन घेणे गरजेचे आहे. जामखेड ग्रामीण रुग्णालय व तीन प्राथमिक आरोग्य केंद्रासह शहरातील काही मेडिकल दुकानांमध्ये देखील टॅमीफ्लूच्या गोळ्या उपलब्ध केल्या आहेत. त्या डॉक्‍टरांनी गरज पडली तरच रुग्णांना लिहुन द्याव्यात. तसेच शहरातील खाजगी डॉक्‍टरांनी आपल्या रुग्णालयात स्वाईन फ्लू बाबत जनजागृतीपर पोस्टर्स लावावेत व रुग्णांनी घाबरुन न जाता त्यांना धीर द्यावा.

डॉ. बोराडे म्हणाले, स्वाइन फ्लू टाळण्यासाठी नागरिकांनी बाहेरून आल्यावर हात स्वच्छ साबणाने धुवावे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, गर्दीचे ठिकाण टाळावे, तसेच खोकला आल्यास रुग्णांनी बाहेर न पडता घरीच विश्रांती घ्यावी. तालुक्‍यात देखील या आजाराच्या अनुषंगाने आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामसेवक, आशा, अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने जनजागृती करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)