पुणे – राज्यशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार येत्या सोमवार पासून शहरातील शासकीय तसेच खासगी शाळा सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गुरूवारी काढले आहेत. या शिवाय, शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील जलतरण तलाव राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंना प्रशिक्षणासाठी सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी काढले आहेत.
शाळा 23 नोव्हेंबर पासून तर जलतरण तलाव उद्यापासून सुरू होणार आहेत. तर जलतरण तलावाचा वापर करण्यास सर्वसामान्यांना मनाई असणार आहे. तर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबधितांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राज्यशासनाने 9 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग येत्या 23 नोव्हेंबर पासून सुरू करण्यास मुभा दिली आहे. त्यानंतर मागील आठवडयात याबाबत, महापालिकेकडून नियोजन सुरू होते, शहरात सुमारे 550 खासगी शाळा असून महालिकेच्या 43 शाळा आहेत. त्यात, 9 वी ते 12 वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात, या शिवाय, खासगी तसेच शासकीय महाविद्यालये असून त्या सर्वांना महापालिकेकडून राज्यशासनाने घालून दिलेली नियमावली बंधनकारक करण्यात आली आहे.
याबाबत, राज्याच्या मुख्य सचिवांनीही आढावा बैठक घेतली असून महापालिकेच्या शाळा वगळता शहरातील खासगी शाळांची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर सोपविण्यात आली आहे. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने पालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची तसेच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलविली असून त्यात, शाळांची, मुलांची सुरक्षा तसेच करोनाचा प्रसार रोखण्यासाठी घ्यायची आवश्यक खबरदारी याबाबत सूचना केल्या जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळी ही बैठक महापालिकेत होणार आहे.