प्रशासकीय इमारतीला तळीरामांचा विळखा 

सातारा  – सातारा मध्यवर्ती एसटी आगारानजीक असलेली जिल्हा प्रशासकीय इमारत तळीरामांचा अड्डा बनली आहे. इमारत परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. इमारतीच्या आवाराची देखभाल करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने तळीरामांचे फावले आहे. या इमारतीच्या आवारात रात्री अपरात्री एखादे दुष्कृत्य घडण्यापूर्वी येथे सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे.

सातारा शहरात मध्यवर्ती बसस्थानकानजीक प्रशासकीय इमारत असून त्यात अनेक शासकीय विभागांची कार्यालये आहेत. सायंकाळनंतर येथे तळीरामांचा अड्डा भरतो. आवारात दारुच्या बाटल्यांचा खच पडला आहे. इमारतीच्या तळमजल्यावर जिल्हा वाहतूक कार्यालय व कौटुंबिक न्यायालयाचे विस्तारीत दालन आहे. ही कार्यालये तळमजल्यावर आहेत. मात्र, या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमले नसल्याने रात्री 9 वाजल्यानंतर मद्यपींची सभा सुरू होते.

या इमारतीला दोन प्रवेशद्वारे असून बसस्थानकाच्या बाजूला असलेले प्रवेशद्वार कमी आहे. मात्र, उत्तर दिशेच्या प्रवेशद्वारातून तळीराम रात्री इमारतीत आणि आवारात घुसखोरी करतात. शासकीय अधिकाऱ्यांनी अनेक बैठकांमध्ये हा विषय उचलून धरला तरी ठोस कार्यवाही झालेली नाही. सायंकाळनंतर प्रशासकीय इमारतीचे आवार निर्जन होते. हे ठिकाण तळीरामांसाठी सोयीचे असून या ठिकाणी एखादी दुर्घटना घडू नये, म्हणून प्रशासनाने वेळीच दखल घेण्याची गरज आहे.
दरम्यान, यापूर्वी इमारतीच्या रंगरंगोटीसाठी 35 लाख रुपये खर्च करण्यात आले होते. डीपीडीसीमध्ये इमारतीच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी करण्यात आली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.