पेठ भागात जिल्हा परिषद शाळांत समाजविघातक मंडळींचे उद्योग सुरू
शाळेच्या बागेतील पाण्याची पाइपलाइनही तोडली
सकाळी फिरायला येणाऱ्या महिला- भगिनींना त्रास
दिलीप धुमाळ
पेठ – आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसर सध्या तळीरामांचा अड्डा झाला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळांना सुटी आहे; पण सध्या या ठिकाणी तळीरामांचे अड्डे जमू लागले असून, शिक्षणाच्या दारी तळीरामांच्या पार्ट्या जोरात सुरू आहेत.
या भागात आताच नाही तर रोज संध्याकाळी किंवा इतर सुट्यांमध्ये आणि शनिवारी, रविवारी समाज विघातक मंडळी, दारू व पत्ते खेळताना दिसून येत आहेत. गुटख्याच्या पिचकाऱ्या मारणे, दरवाजे खिडक्या तोडणे, लोखंडी साखळ्या चोरून नेणे, व्यसन मुक्ती बोर्ड फाडणे इत्यादी गोष्टी गेल्या काही महिन्यांत वाढल्या आहेत. दिवाळी सुट्टीमध्ये बागेसाठी केलेली पाइपलाइन, झाडे काही समाजकंटकांनी तोडून टाकली.
या ठिकाणी सकाळी महिला भगिनी, ग्रामस्थ फिरण्यासाठी येतात. त्यांना या गोष्टीचा त्रास होतोच; पण शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना येथे दारूच्या बाटल्या उचलण्याची वेळ आली आहे. फुटलेल्या बाटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पायाला व हाताला जखमा झाल्या असून, शाळेच्या आवारात पसरलेल्या दारूच्या व पाण्याच्या बाटल्या गोळा करण्यातच शिक्षकांचा महत्त्वाचा वेळ वाया जात आहे. गावातील उनाड तळीरामांचा पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून दारूच्या पार्ट्या जोरात सुरू असून या तळीरामामुळे शिक्षकांसह पालकही हतबल झाले आहेत.
संध्याकाळ होताच गावातील काही उनाड टोळके, तळीराम हे शाळेच्या आवारातच बसून दारूच्या पार्ट्या रंगवत असल्यामुळे शाळेला एखाद्या दारू अड्ड्याचे स्वरूप प्राप्त होत आहे. अशा तळीरामांवर शिक्षण विभागाकडून व पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई केली तरच या पार्ट्या बंद होतील, अन्यथा याचा त्रास विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कायम होणार आहे. या प्रकराची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. हे थांबवण्यासाठी लवकरच येथे सीसीटीव्ही यंत्रणा बसवली जाईल.
– राम तोडकर, संचालक, भैरवनाथ सहकारी पतसंस्था, पेठ
एकीकडे आपण लोकसहभाग, ग्रामपंचायतच्या सहकार्याने शाळा डीजिटल केली, बोलका व्हरांडा केला, शाळा विकासासाठी निधी उभा करतोय, ग्रामस्थ त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र, काही प्रवृत्ती अशाप्रकारे वागतात हे आपल्याला भूषणावह नाही, यासाठी ग्रामपंचायतीने तालुक्यातील इतर प्राथमिक शाळांसारखी या शाळेत शिपाई नेमणूक करावेत.
– सचिन तोडकर, अध्यक्ष, आंबेगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघ