पुणे- पुण्याच्या शाल्मली वाळुंजकर, शाश्वत भोमे, अरत्रिका बिस्वास, सम्यक रामचंद्र यांनी महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित ज्युनियर आणि सब-ज्युनियर गटाच्या राज्यस्तरीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या गटातून सुवर्णपदक मिळवले.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील जलतरण तलावावर या स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत गवारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समन्वयक किशोर शेट्टी, डॉ. संभाजी भोसले, नीता तळवलीकर, रमेश विपट आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील 17 वर्षांखालील मुलींच्या 1500 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात पुण्याच्या शाल्मलीने 20 मि. 25.76 सेकंद वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकाविले. मुंबईच्या अनन्या पांडे (20 मि. 42.25 से.) आणि सुहानी बक्षी (20 मि. 57.54 से.) यांनी अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदक पटकाविले.
अकरा वर्षांखालील मुलांच्या 100 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात पुण्याच्या शाश्वत भोमेने 1 मि. 8.77 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. यानंतर मुलींच्या गटात पुण्याच्या अरत्रिकाने 1 मि. 09.72 सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक पटकावले. स्पर्धेतील 9 ते 10 वर्षांखालील मुलांच्या 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये सम्यकने 32.37 सेकंद वेळ नोंदवून पहिला क्रमांक पटकावला.
स्पर्धेचा निकाल
17 वर्षांखालील मुली – 1500 मी. फ्रीस्टाइल – शाल्मली वाळुंजकर, अनन्या पांडे, सुहानी बक्षी. 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक – करीना शांक्ता, वैष्णवी मोरे, इरावती चेंगलूर. 17 वर्षांखालील मुले – 200 मीटर फ्रीस्टाइल – वेदांत बाफना, रुद्रांश मिश्रा, गौरव चव्हाण. मुली – सीया बिजलानी, हिमानी फडके, मैत्रायनी भोसले. 14 वर्षांखालील मुले – 200 मी. फ्रीस्टाइल – राघव टंडन, वेदांत माधवन, आरुष बधे. मुली – कियारा बंगेरा, पलक धामी, मलिका दासगुप्ता. 14 वर्षांखालील मुले – 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक – अर्जुनवीर गुप्ता, एल. श्रेष्ठ, अन्वेश प्रसादे. मुली – अपेक्षा फर्नांडिस, झारा जब्बार, अनुष्का पाटील.