मुंबई – स्विगी या अन्नपुरवठा करणार्या मंचाने राष्ट्रीय शेअर बाजाराबरोबर सहकार्य करार केला आहे. स्विगी सोबत अनेक डिलिव्हरी पार्टनर काम करीत असतात. त्यांची आर्थिक साक्षरता वाढावी या दृष्टीकोनातून स्विगी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराने करार केला असल्याचे सांगण्यात आले.
स्विगीच्या डिलिव्हरी पार्टनरसाठी राष्ट्रीय शेअर बाजार आर्थिक साक्षरतेचे विशेष कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करणार आहे. विशेषतः स्विगीत काम करणार्या महिलांसाठी हा कार्यक्रम तयार करण्यात येणार असल्याचे स्विगी कंपनीने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. स्विगी कंपनीने आपल्या कामकाजात 2030 पर्यंत किमान एक लाख महिलांना समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी व त्यांना गुंतवणूक विषयक निर्णय घेता यावे त्यासाठी हा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या की महिला मुळातच सर्जनशील असतात. पैसे कमावण्याबरोबरच ते वाढविणे तितकेच महत्त्वाचे असते.
यासाठी महिलांनी या कार्यक्रमात शिकविल्या जाणार्या बाबीचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःचे आर्थिक स्वावलंबन वाढवावे असे फडणवीस यांनी महिलांना सांगितले. या कार्यक्रमाला स्विगी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्षा मजेती व राष्ट्रीय शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान उपस्थित होते.