दिवाळीचा गोडवा…सभासदांना साखर वाटप सुरू

पुणे – दिवाळीनिमित्त साखर कारखान्यांकडून सभासदांना साखररूपी भेट दिली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील सर्वच कारखान्यांकडून ही प्रथा पाळली जात आहे. त्यामुळे सभासदांच्या कुटुंबीयांची यंदाची दिवाळीदेखील गोड होणार आहे. राज्यभरातील हजारो सभासदांना याचा लाभ होत आहे.

राज्यात 195 साखर कारखाने आहेत. आता विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर यंदाचा गळीत हंगाम दिवाळीनंतर सुरू होणार आहे. मात्र, तत्पूर्वी दिवाळीकरिता सभासदांना साखर वाटपाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. काही साखर कारखान्यांकडून मोफत तर, काहींकडून सभासदांना सवलतीच्या दरांत साखर उपलब्ध करून दिली जाते. राज्यातील प्रत्येक साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र ठरलेले आहे. त्या कार्यक्षेत्रामधून मजुरांमार्फत उसाची तोड केली जाते. त्याकरिता या क्षेत्राची कारखान्याच्या अधिकाऱ्यांमार्फत पाहणी केली जाते. सभासदांच्या सातबारानुसार लागवड झालेल्या क्षेत्रातील ऊस लागवडीचे क्षेत्र नोंदविले जाते. त्यानंतर ऊस काढणीनंतर उसातील रासायनिक बदल होण्यापूर्वीच तो गाळपासाठी दिला जातो.

दरम्यान, यानिमित्ताने घेतलेल्या नोंदीनुसार दिवाळीच्या काळात सभासदांना साखर मोफत देण्याचा शिरस्ता साखर कारखान्यांनी आजपर्यंत पाळला आहे. सभासदांची एकूण संख्या, उपलब्ध साठ्यापैकी मोफत वितरणासाठी उपलब्ध असलेला साठा तसेच सभासदांचे ऊस लागवडीचे क्षेत्र यानुसार सभासदाला साखर वितरित केली जाते.

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील सह्याद्री साखर कारखान्याच्या वतीने सभासदांना मोफत साखर उपलब्ध करून दिली आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात या साखरेचा वापर केला जातो. दरवर्षी मिळणाऱ्या साखरेची प्रथा साखर कारखान्यांकडून आजही पाळली जात आहे.
– संभाजी गवळी, सभासद, सह्याद्री साखर कारखाना, सातारा

Leave A Reply

Your email address will not be published.