गेल्या वर्षीच्या तुलनेत किलोला 3 रुपये अधिक
पर्यटन क्षेत्रे खुली झाल्यास भाव वाढण्याची शक्यता
पुणे – पावसाला सुरुवात झाल्यामुळे बाजारात स्वीट कॉर्नला मागणी वाढली आहे. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत किलोच्या भावात 3 रुपयांनी वाढ झाली. पर्यटन क्षेत्र खुली झाल्यानंतर मागणी आणि भावात आणखी वाढ होईल, असा अंदाज व्यापारी पांडूरंग सुपेकर यांनी वर्तविला.
फळ विभागात खेड, मंचर, नारायणगाव येथून रोज 20 ते 25 टनांची आवक होत आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलोस 12 ते 15 रुपये भाव मिळत आहे. जो मागील वर्षी किलोला 10 ते 12 रुपये होता. दरवर्षीच पावसाला सुरुवात झाल्यानंतर स्वीट कॉर्नला मागणी वाढते. यंदा लॉकडाऊनमुळे अद्याप शहर आणि परिसरातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुले झाली नाहीत. तरी मागणी कायम आहे, असे सुपेकर यांनी नमूद केले.
रसद्य:स्थितीत खेड, मंचर, नारायणगाव, बारामती, सोलापूर, नाशिक, सातारा आणि कोकणातून मक्याच्या कणसांना मागणी होत आहे. सुमारे जून ते डिसेंबर या कालावधीत स्वीट कॉर्नचा हंगाम असतो. विशेषत: पावसाळ्यात पर्यटक पर्यटनासाठी घराबाहेर पडतात. त्यामुळे मक्याच्या कणसांना मागणी असते. पर्यटनस्थळे खुली झाल्यानंतर महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, सिंहगड, खडकवासला धरण, पानशेत धरण, राजगड, तोरणा, खंडाळा, लोणावळा, भीमाशंकर, शिवनेरी, निळकंठेश्वर आदींसह शहरातील प्राणी संग्रहालय, सारसबाग, पर्वती, शनिवारवाडा, संभाजी उद्यान, पेशवे उद्यान, पु.ल. देशपांडे उद्यान आदी पर्यटनस्थळी खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडूनही मागणी वाढते.