Sweden – स्वीडनमधील एका प्रौढ शिक्षण संस्थेमध्ये झालेल्या गोळीबारात सुमारे १० जण ठार झाले आहेत. यामध्ये गोळीबार करणाऱ्या बंदुकधाऱ्याचाही समावेश आहे. गोळीबाराची ही घटना स्वीडनच्या इतिहातील सर्वात वाईट घटना असल्याचे स्वीडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टर्सन यांनी म्हटले आहे. गोळीबाराच्या या घटनेतील जखमींचा नेमका आकडा अद्याप समजू शकलेला नाही, असे पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
हा गोळीबार पुर्णपणे निरपराध लोकांविरुद्धचा क्रूर, घातक हिंसाचार होता. या गोळीबारासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि मी त्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थ आहे.
मात्र या प्रश्नांची उत्तरे एक ना एक दिवस आपल्याला समजतीलच. आता त्याबद्दल कोणताच अंदाज वर्तवायला नको, असे पंतप्रधान क्रिस्टर्सन यांनी म्हटले आहे.
Riksdagen och regeringen flaggar idag den 5 februari på halv stång med anledning av gårdagens fruktansvärda våldsdåd på Campus Risbergska i Örebro. Efter beslut av H.M. Konungen flaggas det också på halv stång på Kungl. Slottet och övriga kungliga slott under dagen.
Flaggan…
— SwedishPM (@SwedishPM) February 5, 2025
राजधानी स्टॉकहोमच्या पश्चिमेला २०० किलोमीटर अंतरावरील ओरेब्रो शहराच्या जवळच्या कॅम्पस रिबसबर्गस्का या प्रौढांसाठीच्या उद्योग शिक्षण केंद्रामध्ये मंगळवारी हा गोळीबार झाला होता.
गोळीबारात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो, असे पोलिसांनी म्हटले आहे. हल्लेखोर देखील ठार झाला आहे. या गोळीबारात एकच हल्लेखोर सहभागी असावा, असा अंदाज आहे.
या गोळीबारामागे दहशतवादी हेतू असण्याचा संशय पोलिसांनी फेटाळला आहे. मात्र गोळीबारामागील नेमका हेतू काय असावा, याबद्दल पोलिसांनी काहीही सांगितलेले नाही. गोळीबारानंतर पोलिसांनी संशयिताच्या घरावर छापा घातला.
मात्र तेथे त्यांना काय मिळाले हे जाहीर केले गेले नाही. हल्ल्यापुर्वी कोणताही इशारा दिला गेला नव्हता. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. स्वीडनचे राजे कार्ल १६ वे गुस्ताफ यांनी पोलिसांच्या मदतकार्याचे कौतुक केले आहे.