अंकारा – जर धार्मिक ग्रंथाच्या दहनाला परवानगी दिली जाऊ शकत असेल, तर स्वीडन “नाटो’मध्ये सामील होऊ शकत नाही, असे तुर्कीचे अध्यक्ष इर्दोगन यांनी म्हटले आहे. स्वीडन आणि फिनलंड या दोन्ही देशांना “नाटो’मध्ये सामील होण्याबाबतची परवानगी तुर्कीने अद्याप दिलेली नाही. स्वीडनमध्ये झालेल्या इस्लामविरोधी आंदोलनामुळे स्वीडनला हे सदस्यत्व मिळू नये, अशी भूमिका तुर्कीने घेतली आहे. या भूमिकेचा पुनरुच्चार इर्दोगन यांनी केला आहे.
याबरोबर कुर्दिश बंडखोरांबाबत स्वीडन आणि फिनलंडने आपली भूमिका स्पष्ट करावी, असा आग्रहही तुर्कीकडून धरण्यात येत होता. तुर्कीसाठी दहशतवादी असलेल्या कुर्दिश बंडखोरांना स्वीडन आणि फिनलंडमधून मिळणारा पाठिंबा थांबला पाहिजे, अशी मागणीही तुर्कीच्या वतीने करण्यात येत होती.
“नाटो’च्या विस्ताराच्या मुद्द्यासंदर्भातील ब्रुसेल्समध्ये होणारी एक महत्त्वाची बैठक तुर्कीने बेमुदत पुढे ढकलली आहे. स्वीडनने इस्लामविरोधी आंदोलनाला परवानगी देताना जराही विचार केला नाही. त्यामुळे “नाटो’मधील स्वीडनच्या प्रवेशाला आम्ही परवानगी देणार नाही, असे इर्दोगन यांनी म्हटले आहे.
राजधानी स्टॉकहोम, कोपनहेगन आणि डेन्मार्कमध्ये धार्मिक ग्रंथाच्या दहनाच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर स्वीडन सरकारने अजून मौन बाळगले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे सरकारने म्हटले आहे. स्वीडनच्या पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनी अलीकडेच हे आंदोलन म्हणजे विदेशी गटांचा मूर्खपणा असल्याचे म्हटले होते.