स्टॉकहोम – रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे स्वीडन आणि फिनलंड चिंतेत आहेत. दरम्यान, स्वीडनचे परराष्ट्र मंत्री अॅन लिंडे यांनी शुक्रवारी सांगितले की, नाटोचे सदस्यत्व राष्ट्रीय सुरक्षेला चालना देईल आणि नॉर्डिक आणि बाल्टिक प्रदेशांना स्थिर करण्यास मदत करेल. फिनलंडने NATO मध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या एका दिवसानंतर परराष्ट्रमंत्र्यांचे हे वक्तव्य आले आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे स्वीडन आणि फिनलंड या दोघांनाही जाहीरपणे बाजू घेण्यास भाग पाडले आहे. पत्रकारांशी बोलताना लिंडे म्हणाल्या की, फिनलंडसोबतच स्वीडनही सोमवारी नाटो सदस्यत्वासाठी अर्ज करू शकतो.
कलम 5 चा संदर्भ –
परराष्ट्र मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, स्वीडनचे नाटोचे सदस्यत्व राष्ट्रीय सुरक्षेला चालना देईल आणि नॉर्डिक आणि बाल्टिक प्रदेशांना स्थिर करण्यास मदत करेल. त्याचवेळी त्या पुढे म्हणाल्या की, स्वीडनला नाटोचे सदस्यत्व मिळाल्यानंतर उत्तर युरोपमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला लगाम बसेल. NATO स्थापन करण्याच्या कराराच्या कलम 5 चा संदर्भ देत परराष्ट्र मंत्री म्हणाल्या की स्वीडनच्या नाटोच्या सदस्यत्वाचा सर्वात महत्वाचा परिणाम म्हणजे स्वीडन नाटोच्या सामूहिक सुरक्षेचा भाग असेल आणि सुरक्षा हमींमध्ये त्याचा समावेश केला जाईल. विशेष म्हणजे, अहवालात नाटोमध्ये सामील होण्याची शिफारस करण्यात आलेली नाही, असे सरकारने म्हटले आहे.
तुर्कस्तानने सदस्यत्वाला केला विरोध –
स्वीडन आणि फिनलंडला नाटोचे सदस्यत्व मिळण्यावरून तुर्कीचे अध्यक्ष तय्यप एर्दोगन यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. दोन्ही देशांनी अनेक दहशतवादी संघटनांना आश्रय दिल्याचे एर्दोगन यांनी म्हटले आहे. दरम्यान, गुरुवारी फिनलंडचे अध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणाले की आपण विलंब न करता नाटो लष्करी आघाडीत सामील होण्यासाठी अर्ज केला पाहिजे.
फिनलंडच्या निर्णयावर रशिया नाराज –
फिनलंडच्या नाटोमध्ये सामील होण्याच्या घोषणेवर रशियाने आक्षेप घेतला आहे. रशियाच्या मते फिनलंडचे हे पाऊल रशियासाठी धोक्याचे ठरू शकते. नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी गुरुवारी सांगितले की फिनलंडचे स्वागत केले जाईल. त्याच वेळी, अमेरिकन सरकार देखील दोन्ही देशांना नाटोचे सदस्य होण्यासाठी समर्थन देत आहे. शीतयुद्धात सोव्हिएत युनियनचा मुकाबला करण्यासाठी 1949 मध्ये NATO ची स्थापना करण्यात आली होती.