मुंबई – बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या “पद्मावत’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवर कथित यश मिळविले होते. या चित्रपटानंतर तिने रणवीर सिंहसोबत लग्न करण्यासाठी काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर दीपिकाने “छपाक’ चित्रपटातून पुन्हा वापसी केली.
दीपिका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच सोशलच्या माध्यमातून आपल्या फॅन्सशी संवाद साधते तसेच आगामी प्रोजेक्ट बद्दल सांगत असते. मात्र, नुकतंच दीपिकाला एका चाहत्याने चांगलंच ट्रॉल केले असून, तिला घाण शिव्या सुद्धा दिल्या आहेत. दीपिकाने हा सर्व प्रकार सोशलच्या माध्यमातून उघडकीस आणला असून, या व्यक्तीला तिने चांगलाच धडा शिकवला आहे.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सरळ सरळ साहिल शाह नावाच्या व्यक्तीचे घाणेरड्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यामध्ये दिसत आहे की, साहिलने दीपिकासाठी अपशब्द लिहिले आहेत. दीपिकाने हा स्क्रीनशॉट पोस्ट करताना लिहिले आहे की, व्वा, तुझ्या कुटुंबियांना आणि मित्रांना तुझ्यावर खूपच अभिमान वाटते असेल ना…
दरम्यान, आता दीपिका पादुकोण धूम सीरीजमधील चौथ्या चित्रपटातून धमाकेदार कमबॅक करण्याची तयारी करत असल्याचे समजते. गेल्या अनेक वर्षांपासून धूम फ्रेंचाइजीमध्ये दीपिकाची एंट्री होणार असल्याची चर्चा होती. यातच बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण ‘धूम ४’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या कामाला सुरूवात झाली आहे. दीपिका पादुकोण या चित्रपटात व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे.