17 व्या लोकसभेच्या पहिल्या दिवशी 313 सदस्यांचा शपथविधी

नवी दिल्ली- 17 व्या लोकसभेच्या कामकाजाला आजपासून सुरुवात झाली. संसदेच्या पहिल्याच दिवशी सभागृह नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृह मंत्री अमित शहा यांनी लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. सकाळी सभागृहाचे कामकाज सुरू होताच सदस्यांनी काही मिनिटांची शांतता पाळली. लोकसभेच्या मुख्य सचिवांनी शपथविधीसाठी पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करताच “एनडीए’च्या सदस्यांनी बाके वाजवून पंतप्रधानांचे अभिनंदन केले. याचवेळी “मोदी मोदी’ आणि “भारत माता की जय’च्या घोषनाही दिल्या गेल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर के. सुरेश, ब्रजभुषण शरण सिंह आणि बी. मेहताब या तिघा अध्यक्षांच्या पॅनेलनेही सदस्यत्वाची शपथ घेतली. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील बहुतेक मंत्र्यांनी हिंदीतून शपथ घेतली. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, श्रीपाद नाईक, अश्‍विन चौबे आणि प्रताप चंद्र सारंगी यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. तर डी.व्ही. सदानंद गौडा आणि प्रल्हाद जोशी यांनी कन्नडमधून शपथ घेतली. हरसिमरत कौर बादल यांनी पंजाबीमधून शपथ घेतली.

केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, रावसाहेब दानवे यांनी मराठीतून तर जितेंद्र सिंह यांनी डोंगरी भाषेतून, बाबुल सुप्रियो यांनी इंग्लिशमधून, रामेश्‍वर तेली यांनी आसामी आणि देबश्री चौधरी यांनी बांगला भाषेतून शपथ घेतली.

बिजू जनता दलाचे नेते मेहताब यांनी उडिया भाषेतून शपथ घेतली. “युपीए’ अध्यक्षा सोनिया गांधी, तृणमूल नेते सुदीप बंडोपाध्याय, समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, द्रमुक नेत्या कनिमोळी, ए. राजा आदी याप्रसंगी सभागृहात उपस्थित होते. सभागृहाचे कामकाज सुरू झाले तेंव्हा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सभागृहामध्ये उपस्थित नव्हते.

संसदेच्या कामकाजाला सुरुवात होण्यापूर्वी विरेंद्र कुमार यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनामध्ये हंगामी सभापती म्हणून शपथ दिली. राष्ट्रगीत झाल्यावर संसदेच्या नवीन अधिवेशनाची सुरुवात झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.