न्यू जर्सी (अमेरिका) – हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातले ज्येष्ठ गायक संगीत मार्तंड पंडित जसराज यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. मृत्यूसमयी पंडित जसराज अमेरिकेत न्यू जर्सी इथं होते. तिथेच राहत्या घरी स्थानिक वेळेनुसार पहाटे सव्वापाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कन्या दुर्गा जसराज यांनी ही माहिती दिली.
करोनाच्या साथीमुळे अमेरिकेत लॉकडाऊन लागू करण्यात आला, तेंव्हा पंडित जसराज अमेरिकेतच होते. त्यामुळे त्यांनी तेथून भारतात न परतता तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना परत येण्याची संधीच मिळू शकली नाही. मेवाती घराण्याचे गायक पंडित जसराज यांनी भारतीय शास्त्रीय संगीताला वेगळा आयाम दिला. पंडित जसराज यांनी तब्बल आठ दशकांचा सांगितिक वारसा संगीतप्रेमींसाठी ठेवला आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील सर्वात अलिकडील प्रख्यात गायकांचे ते मानबिंदू होते.
केंद्रशासनाने पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या किताबांसह संगीत नाटक अकादमीच्या फेलोशिपनेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. तर राज्यशासनाने पंडित भीमसेन जोशी गौरव पुरस्कार देऊन त्यांच्या संगीत कलेचा गौरव केला आहे. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील क्षेत्रात शोककळा पसरली आहे. पंडित तसराज यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून संगीतसाधनेला सुरुवात केली.
भोपाळमध्ये जन्म झाल्यानंतर वडील पंडित मोतीराम यांच्याकडूनच त्यांना स्वरांचे प्राथमिक ज्ञान मिळाले. मात्र ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या ज्येष्ठ बंधूनी केला. थोरले बंधू पंडित प्रताप नारायण यांनीच जसराज यांना संगीताचे शिक्षण दिले. लहानपणी जसराज यांना तबला वादक बनायचे होते. मात्र गायक मंडळी अन्य वादक मंडळींना दुय्यम वागणूक देत असल्याचे आढळल्यानंतर जसराज यांची गायन साधना सुरू झाली. कठोर परिश्रमांनी स्वरांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी त्यांनी एका दिवशी तब्बल 14 तासांपर्यंत रियाझ केल्याचीही आठवण आहे. लहान वयात गानतपस्या करून त्यांनी गाण्यावर प्रभूत्व मिळवले.
ठुमरी ते ख्याल पर्यंत सर्व प्रकारच्या अभिजात संगीत प्रकारांमध्ये त्यांनी सुलभता आणली. त्यामुळे अभिजान शास्त्रीय संगीताकडे सर्वसामान्य श्रोते आकर्षित झाले. अर्ध्या दशकापूर्वी ख्याल गायकीमध्ये अशाप्रकारचा बदल करणे शास्त्रीय संगीतातील विश्वामध्ये निंदनीय मानले जात असे. मात्र पंडीत. जसराज यांनी त्यातील क्लिष्टता काढून टाकल्यामुळे श्रोत्यांनी ही गायकी प्रेमाने स्वीकारली. पंडीत जसराज यांनी त्यांच्या समकालिन अनेक गायकांना मोलाचे मार्गदर्शन आणि स्नेह दिला. भारतासह अमेरिका, कॅनडा येथे त्यांचे अनेक शिष्य आहेत. भारतात पं. संजीव अभ्यंकर, कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत. आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने 11 नोव्हेंबर 2006 मध्ये ‘2006 व्हीपी 32’ या छोट्या ग्रहाला पंडित जसराज असे नाव देऊन जसराज यांचा गौरव केला होता.
शिष्योत्तमांची परंपरा…
पंडित जसराज यांनी शिष्योत्तमांची एक मोठी परंपरा निर्माण केली. त्यात अनेक नामवंत शास्त्रीय गायकांचा समावेश आहे. सप्तर्षी चक्रवर्ती, संजीव अभ्यंकर, कला रामनाथन, तृप्ती मुखर्जी, सुमन घोष, शशांक सुब्रह्मण्यम, अनुराधा पौडवाल, साधना सरगम आणि रमेश नारायणन् आदींचा त्यात समावेश आहे. ऍटलांटा, टम्पा, व्हॅनकोव्हर, टोरॅंटो, न्यूयॉर्क, न्यू जर्सी, पिटसबर्ग आणि मुंबईत त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीत शिकवणारी विद्यालये सुरू केली. वयाच्या नव्वदीतही ते शिष्यांना स्काईपवरून मार्गदर्शन करत असत.
संगीत महोत्सव…
आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ते हैदराबादमध्ये दरवर्षी संगीत महोत्सव भरवत असत. पंडित मोतीराम पंडित मणीराम संगीत समारंभ असे त्याचे नाव आहे. 1972 पासून हा स्वराभिषेक अखंड सुरू होता.
माय जर्नी :वयाच्या 87 वर्षी जसराज यांच्या 80 वर्षांच्या संगीतसेवेची वाटचाल दाखवणाऱ्या माय जर्नी या कार्यक्रमाचे आयोजन 28 जानेवारी 1987 ला केले होते. त्यावेळी जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये जमलेल्या सुजाण श्रोत्यांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली.
क्रांतिकारी पथदर्शी
पं. जसराज हे मेवाती घराण्याचे गायक होते. ख्याल गायकीसाठी हे घराणे प्रख्यात आहे. ख्याल गायकीत त्यांनी तरलता आणली. त्यात ठुमरीचा समावेश करून अधिक सहज बनवली. आपल्या गाण्यात ते अन्य घराण्याच्या गायकीचा समावेश करत असल्याबद्दल सुरवातीच्या काळात सनातनी संगीतकारांकडून त्यांच्यावर टीका होत असे. मात्र अन्य गायकीतील अनेक भाव उचलण्याची ही प्रथा आता सर्रास वापरली जाते. त्या दृष्टीने ते संगीत क्षेत्रातील पथदर्शी क्रांतिकारीच होते, असे त्यांच्या बाबत सन्मानाने म्हटले जाते. पुरूष आणि स्त्री गायकांच्या एकाच वेळी भिन्न राग म्हणण्याची जुगलबंदी जसरंगी या नावाने त्यांनी सुरू केली.
पुरस्कार आणि सन्मान
– पद्मश्री (1975)
– संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1987)
– पद्मभूषण (1990)
– पद्मविभूषण (2000)
-स्वाती संगीत पुरस्कार (2008)
– संगीत नाटक अकादमी फेलोशीप (2010)
– पु. ल. देशपांडे जीवनगौरव पुरस्कार (2012)
– भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार (2013)
– सुमित्रा चरत राम जीवनगौरव पुरस्कार (2014)
– मारवाड संगीतरत्न पुरस्कार (2014)
– गंगुबाई हंगल जीवनगौरव पुरस्कार (2016)
– अवकाशसंशोधकांनी शोधलेल्या एका ग्रहालाही पंडित जसराज यांचे नाव देण्यात आले होते.
– महाराष्ट्र गौरव पुरस्कार
पंडित जसराज यांच्या निधनाने भारताच्या सांस्कृतिक विश्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या अलौकिक गायनशैलीबरोबरच, संगीत क्षेत्रातील अनेक शास्त्रीय गायकांसाठी ते गुरुस्थानी होते. त्यांचे कुटुंबीय आणि जगभरात पसरलेल्या त्यांच्या सर्व चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती…
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान