उमेदवारी अर्जासाठी आजपासून झुंबड

अर्ज भरण्यासाठी उरले केवळ पाच दिवस; प्रमुख पक्षांचे उमेदवार गुलदस्त्यात

पिंपरी – विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास शुक्रवारपासून (दि. 27) सुरूवात झाली असली तरी पितृपक्षामुळे शुक्रवारी पहिल्या दिवशी 58 जणांनी अर्ज घेतले होते. पितृपक्ष संपला असून, उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ पाच दिवस राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारी अर्ज घेण्यासाठी उद्यापासून झुंबड उडण्याची शक्‍यता आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात विधानसभेचे तीन मतदारसंघ येतात. या तिनही मतदारसंघात तिरंगी लढती होण्याची शक्‍यता आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असली तरी या दोन्ही पक्षांत शहरातील मतदारसंघावरून ठिणगी पडली आहे. तर युतीचे अद्याप तळ्यात मळ्यात आहे. पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो काही जणांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा तयारी केली आहे. युती आणि आघाडीने अद्यापपर्यंत उमेदवारीचे पत्ते ओपन केले नसले तरी पिंपरीतून गौतम चाबुकस्वार यांनी शिवसेनेची उमेदवारी मिळाल्याचा दावा केला आहे. उर्वरित दोन मतदारसंघावरून युतीमध्ये चर्चा सुरू आहे.

27 सप्टेंबरपासून भोसरी, पिंपरी आणि चिंचवडसाठी उमेदवारी अर्ज खुले करण्यात आले आहेत. सकाळी 11 ते 3 या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. 4 ऑक्‍टोबर रोजी दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. पितृपक्ष संपला असल्याने नवरात्रोत्सवाचा मुहूर्त साधण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असणार आहे. शुक्रवारी पितृपक्ष असतानाही एकूण 58 जणांनी आले उमेदवारी अर्ज घेतले होते. यामध्ये सर्वाधिक 30 अर्ज पिंपरी मतदारसंघातील इच्छुकांनी घेतले असून, भोसरीतून 13, तर चिंचवडमधील 15 इच्छुकांचा समावेश आहे.

आयत्यावेळी गर्दीची शक्‍यता – 
युती आणि आघाडीतील चारही प्रमुख पक्षांनी आपले पत्ते ओपन केले नसून, वंचित आणि “एमआयएम’चेही उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. प्रमुख पक्षांचे उमेदवार येत्या एक- दोन दिवसात जाहीर होण्याची शक्‍यता आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. त्यामुळे दोन किंवा तीन दिवसांत उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्‍यता आहे.

अपक्षांची संख्या वाढणार – 
सन 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चार पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते. यावेळी मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी केली असून युतीची चर्चाही अंतिम टप्प्यात आहे. कॉंग्रेस वगळता तीनही मतदारसंघात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे इच्छुकांचा मोठा भरणा आहे. ज्यांना संधी मिळणार नाही, ते बंडखोरीच्या पवित्र्यात असल्याने यावेळी अपक्षांची संख्याही वाढण्याची शक्‍यता आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)