स्वारगेट ते कात्रज मेट्रो भुयारीच

व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांची माहिती
पुणे – स्वारगेट ते कात्रज मेट्रो भुयारी होणार असून, त्याचा डीपीआर “महामेट्रो’ने तयार केला आहे. मात्र, याला अंतिमत: महापालिकेची मंजुरी लागणार आहे. याचा खर्च करण्यासाठी पैसा कसा उभारायचा याचे अनेक पर्याय महापालिकेला दिल्याचे, “महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संगितले.

स्वारगेट ते कात्रज दरम्यान एलिव्हेटेड मेट्रो मार्ग बनवणे सद्यपरिस्थितीत तांत्रिकदृष्ट्या कठीण आहे. त्यामुळे तेथे भुयारी मेट्रोचा पर्याय अधिक योग्य आहे. मात्र, यामध्ये महापालिकेची परवानगी अंतिम असणार आहे, असे दीक्षित यांनी नमूद केले. या मार्गाबाबत दोन ते तीन पर्याय होते, त्यातला भुयारी मार्गाचा पर्याय सर्वच दृष्टीने योग्य आहे. या मार्गासाठी खर्च कसा उभा करायचा याच्या पर्यायांचा विचार करण्यात येत आहे.

महापालिकेलाही काही पर्याय सूचविण्यात आले आहेत. खर्चाबाबतचाही अंतिम निर्णय महापालिकेने घ्यायचा आहे, असे दीक्षित यांनी नमूद केले. या मार्गावर एलिव्हेटेड मेट्रो मार्ग तयार करताना तो सरळ करणे शक्‍य नाही. त्यामध्ये शंकर महाराज उड्डाण पूल अडथळा ठरत आहे. यामुळे हा मार्ग बराच फिरून न्यावा लागेल. त्या अंतराचा विचार केला तर ते साडे अकरा किमी होते. आणि भुयारी मार्ग केल्यास तो पाच ते सहाच किमीचा होईल. भुयारी मार्गाचा एक किमीचा खर्च सुमारे पाचशे कोटी रुपये आहे. त्यानुसार हा खर्च 3 हजार 600 कोटी रुपयांच्या आसपास असेल, असे दीक्षित म्हणाले.

मेट्रो मार्गांचे नामकरण मेट्रोकडून करण्यात येणार असून वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग नदीच्या परिसरातून जात असल्याने त्याला “ऍक्वा’लाईन किंवा “ब्लू लाईन’ तर पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन शहरांना जोडणाऱ्या मेट्रो मार्गाला “पर्पल लाईन’ संबोधण्याविषयीचा विचार सुरू असल्याचे दीक्षित म्हणाले.

पिंपरीमध्ये “मेट्रो नियो’
नाशिकप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही “मेट्रो नियो’चा प्लॅन “महामेट्रो’ने केला आहे. सुमारे 50 किमीपर्यंत ही “मेट्रो नियो’ चालवली जाणार आहे. सध्या ही दोनच मार्गांवर असली तरी, सुमारे साडेसहा लाख प्रवासी याचा लाभ घेतील, असा दावा मेट्रोतर्फे करण्यात आला आहे. ही “मेट्रो नियो’ मॉडिफाईड असून, याला रेल्वेसारखे चाकही नाहीत आणि ती रुळावरही चालणार नसून, त्याला टायर आहेत. तसेच ती एलिव्हेटेड किंवा भुयारीही नसून, अन्य चारचाकी गाड्यांप्रमाणे किंवा “ट्राम’ प्रमाणे रस्त्यावरून धावणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.