पुणे – स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली होती. याच प्रकरणातील आराेपी दत्तात्रय गाडे याच्या एका वकिलाकडे सहायक म्हणून काम करणाऱ्या वकिलाचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
साहिल डोंगरे असे मारहाण झालेल्या सहायक वकिलाचे नाव आहे. तो गाडे याचे वकील वाजेद खान बिडकर यांच्याकडे सहायक वकील म्हणून काम करतो. या हल्ल्याच्या घटनेबाबत वाजेद खान बिडकर यांनीही दुजोरा दिला आहे. त्यांनी साहिल डोंगरे यांचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. त्यात डोंगरे सांगत आहेत की, रात्री दहा ते साडेदहाच्या सुमारास एका केस संदर्भात मी हडपसर पोलीस स्टेशन येथे गेलो होतो. एक पक्षकार मला भेटून गेला आणि त्याने मला ५४ हजार रुपये दिले होते. मला सारखे वाटत होते की कुणीतरी माझा पाठलाग करीत आहे.
मी तिथून पेट्रोल संपले म्हणून पाऊण ते एकच्या सुमारास पेट्रोल पंपावर गेलो होतो. रस्त्याच्या कडेला मला कुणीतरी मदत मागितली तिथे गेलो. अचानक मागून एक गाडी आली. मला गाडीत घातले. डोळे उघडले तेव्हा मारहाण करून दिवे घाटात सोडून देण्यात आले. मी स्वत: कसा आलो हे माझे मला माहिती. मारहाण झाल्यानंतर मी स्वत: जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.