पुणे – दिवाळीच्या सुट्ट्या संपत आल्याने स्वारगेट बसस्थानकात राज्याच्या कानाकोपऱ्यातून बसेस परतत आहेत. त्यामुळे स्थानकात एसटी संख्या वाढल्याने सोमवारी मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याचे दिसून आले. स्थानकात बेशिस्तपणे बस उभ्या राहत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. तसेच, स्थानकातून बस बाहेर पडण्यासाठी वेळ लागत असल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
स्वारगेट स्थानकात बसचालक कोठेही बस थांबवत असल्याने दररोजच कोंडी होत आहे. बसचालक आणि स्थानकातील नियोजन करणारे अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे प्रवाशांना बॅग, साहित्यासह धावपळ करावी लागत आहे. यात वयोवृद्ध प्रवाशांनाही त्रास होत आहे. तसेच ठरलेल्या जागेवर बस उभ्या केल्या जात नसल्याने प्रवासी संभ्रमात पडत आहेत. यामुळे स्थानक प्रशासनाने जादा बसेस सोडल्यानंतर नियोजन करणे आवश्यक असल्याचे अनेक प्रवाशांचे मत आहे.
अखेर वाहतूक पोलीस आले…
हडपसर ते स्वारगेट मार्गावर वाहनांची संख्या सोमवारी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे स्वारगेट स्थानकातून बस बाहेर पडण्यासाठी चालकांना कसरत करावी लागत होती. त्यामुळे स्थानकात एस.टी. बसेसची रांग लागलेली होती. अखेर दोन वाहतूक पोलीस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर हडपसकडून येणारी वाहतूक थांबवत बसला वाट मोकळी करून दिली.