पुणे: हलकसं धुकं पांघरून अवतरलेली दीपोत्सवाची पहिल्या दिवसाची पहाट स्वरसाजाने आणखीनच खुलली. मराठी संगीतविश्व समृद्ध करणाऱ्या “गानधारांत’ चिंब चिंब होत रसिक पुणेकरांनी सहकुटुंब-सहपरिवार हा स्वरास्वाद घेत सुरमयी दीपावलीला खऱ्या अर्थाने प्रारंभ केला.
निमित्त होतं, प्रायोजक “पुनीत बालन ग्रुप’ आणि सहप्रायोजक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी यांच्या सहकार्याने दैनिक “प्रभात’ ग्रुपच्या “डिजिटल प्रभात’ने शुक्रवारी, (दि.21 ) वसुबारसेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या “नक्षत्रांचे गाणे’ या गानमैफलीचे…यातून पुन्हा एकदा “दिवाळी पहाट’ची रेलचेल सुरू झाली अन् वातावरण सुरमयी झाले.
गेल्या अनेक वर्षांपासून दैनिक “प्रभात’ परिवारातर्फे पुणेकरांसाठी संगीतमय दिवाळी साजरी केली जाते. या वर्षीही या संगीतमैफलीचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिरात शुक्रवारी केले होते. पहाटे सव्वासहा वाजता या सुरेल मैफिलीला “गजानना श्री गणराया’ या गणेशाच्या आराधनेने आरती दीक्षित यांनी सुरूवात केली. त्यानंतर एकापेक्षा एक सुरस गाण्यांनी ही पहाट उत्तरोत्तर बहरली.
कार्यक्रमाचे सहप्रायोजक “लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑप. सोसा.लि.’चे सहायक क्षेत्रीय प्रबंधक हर्षद झोडगे, समन्वयक भालचंद्र कुंटे, दैनिक “प्रभात’ परिवाराचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय, स्नेही, रसिकप्रेक्षक उपस्थित होते. दीक्षित यांनी “आली माझ्या घरी ही दिवाळी’ हे गीत सादर केले आणि दिवाळीचा “फील’ आणला. तर, नव्या दमाचे गायक संदीप उबाळे, अमृता नातू आणि प्राजक्ता जोशी-रानडे यांनी आबालवृद्धांना खिळवून ठेवतील, अशी गाणी सादर केली. संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला, पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेला आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेला “मोगरा फुलला’ हा अभंग प्राजक्ता जोशी -रानडे यांनी सादर केला. त्यांनी ग. दि. माडगुळकर, सुधीर फडके आणि आशा भोसले असे अद्भूत रसायन असलेले “या सुखांनो या’ गाणे सादर केले. गदिमांच्या लेखणीतून उतरलेले “त्या तिथे पलिकडे… तिकडे माझिया प्रियेचे झोपडे’ हे गाणे गायले. “तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवे’ या चित्रपटासाठी स्वत:च गायलेले “गोऱ्या गोऱ्या गालावरी सजली लाली, नवरी आली’ हे गाणे सादर केले.
अमृता नातू यांनी कवी मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे यांचे “श्रावणात घननिळा बरसला’ हे गीत, “केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’, “फुलले रे क्षण माझे, फुलले रे’, “दिस चार झाले मन, पाखरू होऊन’, “तुम्हांवर केली मी मर्जी बहाल’ ही गीते सादर केली. संदीप उबाळे यांनी “राधा ही बावरी’, “पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले…’ ही गाणी सादर केली. त्याचबरोबर “स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेचे शीर्षकगीत जे उबाळे यांनी स्वत: गायले आहे ते त्यांनी सादर केले आणि “वीरश्री’ची अनुभूती प्रेक्षकांना मिळाली.
वादक आणि निवेदकांनीही मिळवली वाहवा
गायकांबरोबरच वादकांनीही या कार्यक्रमाला चार चॉंद लावत वाहवा मिळवली. अमित कुंटे यांच्या तबलावादनाने ठेका धरायला लावलाच; परंतु नीलेश देशपांडे यांच्या बासरी वादनानेही प्रेक्षकांची दाद मिळवली. याशिवाय प्रसन्न बाम, अमृता केदार, अभय इंगळे या वादकांनी आणि रसाळ आणि माहितीपूर्ण निवेदन सादर करणाऱ्या प्राजक्ता मांडके यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
लावणीने ‘दिवाळी पहाट’ला विशेष बहर
कोणत्याही गाण्याचा कार्यक्रम लावणी आणि गवळणशिवाय साजरा होतच नाही. आधी राजाश्रय आणि नंतर लोकाश्रय मिळालेल्या लावणीने एक काळ गाजवला. “जेवणाला जशी मीठाशिवाय चव नाही, तशीच गाण्याच्या कार्यक्रमाला लावणीशिवाय चव नाही’ अशा शब्दांत निवेदिकेने वर्णन केले, त्याची अनुभूती सादर केलेल्या लावणीतून मिळाली. “जाऊद्या सोडा जाऊ द्या’ ही लावणी प्राजक्ता यांनी सादर करत उपस्थितांना संगीताच्या वेगळ्याच बाजात नेले. याशिवाय “गं साजणे… आली ठुमकत नार लचकत’ या उबाळे यांनी खड्या आवाजात सादर केलेल्या लावणीने तर कार्यक्रमाची उंची वर नेली.
ड्युएट गाण्यांनाही उत्फूर्त दाद
“जोगवा’ चित्रपटातील “जीव दंगला गुंगला रंगला असा…’ या उबाळे आणि प्राजक्ता यांनी सादर केलेल्या गाण्याला प्रेक्षकांनी “वन्स मोअर’ दिला. “हा खेळ सावल्यांचा’ चित्रपटातील प्रसिद्ध असलेले “गोमू संगतीनं माझ्या तू येशील का’ हे गाणे याच जोडीने सादर केले आणि वातावरणात गोडवा आणला. त्यानंतर या दोघांनीच “चिंब भिजलेले रूप सजलेले’ हे गीत सादर करून, पावसाला कंटाळलेल्या पुणेकरांना “गुड फील’ दिला. “आली ठुमकत नार लचकत’ आणि “ढिपारी ढिपांग..ढिचीपारी ढिपांग’ ही गाणी तिघांनी मिळून सादर करत “वन्स मोअर’ घेत, एकमेकांना कोरस देत सादर केली आणि कार्यक्रमाची सांगता केली.
गवळण…अन् प्रेक्षकांनी धरलेला ठेका
याशिवाय “पडछाया’ चित्रपटातील “ऐन दुपारी, यमुना तीरी खोडी उगी काढली’ या गवळणीने तर प्रेक्षकांनाही ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. एका रसिक प्रेक्षकाने गाण्यावर नाच केलाच परंतु, विशेषत: त्यातील ढोलकीच्या तालावर त्यांनी ठेका धरला. त्यासाठी तबलावादक अमित कुंटे यांनी तबल्यावरच ढोलकी बाज वाजवत रसिकांची वाहवा आणि “वन्स मोअर’ही मिळवला.