स्वराज्यरक्षक ‘संभाजी’ मालिका बंद होणार नाही

स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबतच्या सर्व अफवांना अमोल कोल्हेंचे सडेतोड उत्तर

पुणे : गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेला आज मालिकेमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे पात्र साकारत असलेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी परखड शब्दात उत्तर दिले. याबाबत डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक खात्यावरून एक व्हिडीओ संदेश दिला असून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आपल्या नियोजित वेळेप्रमाणे अखंड सुरु राहणार असल्याची माहिती त्यांनी या व्हिडिओद्वारे दिली आहे.

या व्हिडिओमध्ये बोलताना खासदार कोल्हे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेबाबत अफवा पसरविणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावली असून सर्व अफवांना देखील परखड उत्तर दिलं आहे. दरम्यान, काही समाजकंटकांनी एका प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीचे वृत्त असल्याचे भासवत, ‘स्वराज्यरक्षक संभाजी मालिका बंद करण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिले आहेत’ आशा आशयाचे एक ग्राफिक्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केले होते. शरद पवारांवरील या खोट्या आरोपांचे खंडन करताना अमोल कोल्हे यांनी, ‘कलाप्रेमी शरद पवारांनी मला कधीही अशाप्रकारचे आदेश दिले नाहीत.’ असा निर्वाळा केला.

समाज कंटकांकडून अशा प्रकारच्या अफवा पसरवून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देखील खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी बोलताना केला.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.