मुंबई- अभिनेता स्वप्निल जोशी नवरात्री निमित्त घरातील कायम सोबत असणाऱ्या स्त्रीशक्तीला वंंदन करतो आहे. आई, पत्नी आणि आता मुलीचा फोटो पोस्ट करत तो त्या तिघींचे आभार मानताना दिसतो आहे. सोशल मीडियावर मुलीचा क्यूट फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
मी नेहमी ऐकलं होतं की बापाचा जीव त्याच्या मुलीत असतो, मुलगी म्हणजे बापाचं काळीज… खरं सांगू तर ही जड वाक्य ऐकायला छान वाटतात पण मला आधी ती जरा overrated वाटायची.. पण ज्या दिवशी मायराचा जन्म झाला आणि मी पहिल्यांदा तिला हातात घेतलं तेव्हा मला काहीतरी वेगळंच वाटलं.. असं वाटलं की खरंच माझा जीव माझ्या शरीरातून निघून तिच्यात गेला, असं त्याने आपल्यामुलीबद्दल लिहिलं आहे.
मायरा तू मला किती आनंद देतेस किंवा माझ्यासाठी काय आहेस हे सांगायचं हा दिवस नाहीए. पण तू वयानी लहान असलीस तरी तुझी ताकद, तुझा महिमा आणि तुझा माझ्या आयुष्यात असणारा प्रभाव प्रचंड आहे. ‘तुझ्यातलं स्त्रीत्व’ असं म्हणण्यासाठी सुद्धा अजून तू लहान आहेस, पण उशिरा घरी आल्यावर, “बाबा तू जेवलास नं?”… थकून आल्यावर, “दमलास का? मी पाय चेपू का?” हे विचारण्यासाठी एका स्त्रीचं काळीजच लागतं आणि हे तू अगदी तिसऱ्या वर्षांपासून करतोयस!
देव ज्यांना मुलं देतो ते लकी असतात पण मुली देतो, ते देवाचे जरा जास्त लाडके असतात!, असं म्हणत त्याने देवाचे आभार मानले आहे.