मुंबई : मागच्या काही वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘नाच गं घुमा’, ‘अल्याड पल्याड’, ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ हे चित्रपट रिलीज झाले आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या ह्या चित्रपटांना प्रेक्षकांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यादरम्यान आता स्वप्नील जोशीचा ‘बाई गं’ चित्रपट लवकरच थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आज ‘वटपौर्णिमे’चे निमित्त साधत ‘बाई गं’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यतात आला आहे. या टिझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
काय आहे टिझरमध्ये?
या टिझरमध्ये तुम्ही पाहू शकता कि ५ बायकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वप्नील जोशीची कसरत पाहायला मिळत आहे. एका मद्यधुंद अवस्थेत देवाकडे पत्नीला परत मागतो. तेव्हा देव प्रसन्न होऊन त्याला त्याच्या पाच जन्मातील बायका परत करतो, असे सांगतो. त्या बायकांच्या जोपर्यंत अपूर्ण इच्छा पूर्ण होत नाहीत, त्याशिवाय त्या जाणार नाहीत, असं देव त्याला सांगतो. स्वप्नील मद्यधुंद अवस्थेत देवाला होकार देतो. पण दुसऱ्या दिवसापासून तो शुद्धीत आल्यानंतर त्याची खरी तारेवरची कसरत पाहायला मिळते. ५ बायकांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा स्वप्नील कशी पूर्ण करतो ? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
या कलाकारांनी साकारली महत्वाची भूमिका
चित्रपटात प्रमुख भूमिकेत स्वप्नील जोशीसह प्रार्थना बेहेरे, सुकन्या मोने, अदिती सारंगधर, दीप्ती देवी, नम्रता गायकवाड, नेहा खान, सागर कारंडे दिसणार आहेत. पांडुरंग कृष्णा जाधव आणि विपुल देशमुख यांनी या या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. तर संकलन निलेश गावंड यांनी केले आहे. छायांकन नागराज एमडी दिवाकर यांनी केले आहे. हा चित्रपट 12 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.एक हटके कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.