मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. यावर वाद-प्रतिवाद सुरू असतानाच आता श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी छत्रपती शिवरायांच्या सूरत लुटीबाबत वेगळेच विधान केले आहे.
गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळाला भेट दिली असता एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले, संपूर्ण राज्य हिंदूंचे आहे, असे मानून छत्रपती शिवाजी महाराज कार्य करत होते. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान जेव्हा महाराजांना आर्थिक चणचण भासत असे आणि अशावेळी कुठलाही उपाय दिसत नसे. तेव्हा आज ज्याप्रकारे ईडी सक्तीची वसुली करते.
त्याचप्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी काही लोकांकडून सक्तीची वसुली केली. हिंदवी स्वराज्यासाठी जो कर भरायला हवा होता, त्याची महाराजांनी सक्तीची वसुली केली, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, २२ जानेवारी रोजी जेव्हा अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला होता. त्या सोहळ्यात बोलत असताना गोविंददेव गिरी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा श्रीमान योगी असा उल्लेख केला होता.