स्वच्छ भारत चळवळ आगामी काळात नकोच – आदित्य ठाकरे

पर्यावरण कार्यकर्त्यांसोबत संवाद

पुणे – “स्वच्छता चळवळ म्हणजे काही महान काम नसून, ती एकप्रकारची शिक्षाच आहे. आधी आपण कचरा करायचा आणि नंतर तोच स्वच्छ करण्यासाठी चळवळ राबवायची, हे कितपत योग्य आहे. त्याऐवजी आधीच स्वच्छेतेबाबत जागरूक राहून, कचरा निर्माण होणार नाही याची दक्षता घेतल्यास स्वच्छता चळवळ राबविण्याची गरजच पडणार नाही. आगामी काळात स्वच्छ भारत चळवळ नकोच, असे मत पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्‍त केले. एका कार्यक्रमादरम्यान शहरातील पर्यावरण कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना ठाकरे यांनी हे मत व्यक्‍त केले.

ठाकरे म्हणाले, “आज आपण आपल्या मुलांना समुद्र किनारे साफ करायला लावत आहोत, त्यांना स्वच्छता मोहीमेत सहभागी व्हायला भाग पाडत आहोत. आपल्या पिढीने प्लॅस्टिक वापरले, कचरा व्यवस्थापन केले नाही, समुद्र किनारे, नद्या-नाले, हवा प्रदूषित केली आणि याचे परिणाम आपली पुढची पिढी भोगत आहे. स्वच्छता मोहीमेच्या नावाखाली आपण आपल्या मुलांना एक प्रकारे शिक्षाच देत आहोत. अशाप्रकारे स्वार्थी बनणे आपण थांबविले पाहिजे. आपण करत असलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट आपणच लावली पाहिजे.’

मुंबईत काम करताना घनकचरा व्यवस्थापन हा आज आमच्या समोरचा फार मोठा प्रश्‍न आहे. 2017 मध्ये मुंबईत एकदिवसात 10 हजार मेट्रिक टन कचरा गोळा होत होता. यावर काम करण्याचे ठरविल्यानंतर आम्ही कचऱ्याच्या विभाजनावर भर देत ओला, सुका कचरा वेगळा करून देण्याची मोहीम राबविली आणि ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन केले. याचाच परिणाम म्हणून केवळ हे विभाजन केल्याने हा आकडा 6.5 मेट्रिक टन इतक्‍यावर आला. याच सकारात्मक दृष्टीकोनातून आम्ही काम करणार आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.