स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माण-खटावमधून संदीप मांडवेंना उमेदवारी

सातारा जिल्ह्यात माण-खटाव मतदारसंघात महायुती व आघाडीमध्ये अधिकृत उमेदवारांच्या निश्‍चित करण्यावरून घोळ सुरू असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्याच्या पोराला न्याय दिल्याची भावना व्यक्‍त होत आहे. यामध्ये स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्‍ते अनिल पवार यांची खेळी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे.

संदीप मांडवे यांनी गेली दोन वर्षे गावागावात कामे करत विधानसभेसाठी तयारी केली होती. मात्र, बदलत्या राजकारणात माणमध्ये “आमचं ठरलंय’ पॅटर्न पुढे आला. त्यात मांडवे यांना उमेदवारी मिळेल, अशी आशा होती. मात्र, त्यांची निराशा झाली.

त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन उमेदवारी अर्ज भरण्याचा निर्णय घेतला. स्वाभिमानीचे प्रदेश प्रवक्ते अनिल पवार यांनी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून स्वाभिमानीकडे खेचून संदीप मांडवेंची उमेदवारी निश्‍चित केली. त्यामुळे खटाव तालुक्‍यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. मांडवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली.

Leave A Reply

Your email address will not be published.