सातारा : सातारा तालुक्यात महामार्गाचे काम सुरू असून खोडद- निसराळे फाट्यावर कमी उंचीच्या पुलामुळे ऊस वाहतूक तसेच इतर वाहतुकीवर परिणाम झाला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह ग्रामस्थांनी पुलाचे काम थांबवले. संबंधित कंपनीची वाहने अडवली. यादरम्यान बोरगाव पोलिसांनी कंपनी अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये मध्यस्थी केल्यानंतर पुलाच्या उंचीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
घटनास्थळ आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून मिळालेली माहिती अशी की, पुणे- बंगळुरू महामार्गाचे काम सुरू आहे. निसराळे फाटा येथे कमी उंचीच्या पुलामुळे ट्रॉलीमधील ऊस पुलाच्या वरील भागास अडकल्याने मोळ्या पडून शेतकऱ्याचे नुकसान होते. यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली होती. शनिवारी सकाळी खोडद- निसराळे फाट्यावर संबंधित ठेकेदाराची सर्व यंत्रणा अडवून ठेवली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्याबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी मोबाइलवरुन संपर्क साधला. तसेच आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेतल्या. यावर राजू शेळके यांनी खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासमोर हा विषय घेऊन तत्काळ सुटण्यासाठी नियोजन करावे, अशी मागणी केली.
राजू शेळके म्हणाले, मागील अनेक दिवस पुणे- बंगळूरू महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम सुरू आहे. बोरगाव ते उंब्रज दरम्यान महामार्गावर कमी उंचीचे पूल असल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थांचीही गैरसोय होत असल्याबाबत महामार्ग प्राधिकरणाला निवेदन दिले होते. तसेच खोडद- निसराळे फाटा येथील पुलाव्यतिरिक्त बोरगाव, नागठाणे, माजगाव, काशीळ, इंदोली, उंब्रज या ठिकाच्याही कमी उंचीच्या पुलामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढील ३०- ४० वर्षानंतर असणाऱ्या परिस्थितीचा विचार करून पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी आमची भूमिका आहे.
राजू शेळके यांच्यासह आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवराज घोरपडे, विजय घोरपडे, जितेंद्र पवार, राजू घाडगे, उमेश घाडगे, सुरेश जाधव, अभिजित घोरपडे यांच्यासह निसराळे, खोडद, वारणानगर, जावळवाडी, अतीत, रामकृष्णनगर, काशीळ, कामेरी परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.