स्वॅब चाचणी अहवाल 12 तासांत

आरोग्य विभागाची माहिती

पुणे – करोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे स्वॅब अहवाल लवकर मिळाले, तर वाढता प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी महापालिकेकडून आलेल्या स्वॅबचा अहवाल आता बारा तासांच्या आत दिला जाणार आहे. तर स्वॅब तपासणीची संख्याही वाढविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ससून रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक करोना संशयिताची तपासणी रुग्णालयातील लॅबमध्ये केली जाते. दररोज अडीशचे ते तीनशे नमुने तपासणी केली जात आहे. रविवारी (दि. 21) दिवसभरात 286 संशयितांची तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पुणे महानगरपालिका प्रतिबंधित क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी करत आहे. त्यासाठी स्वतंत्र स्वॅब तपासणी केंद्र सुरू केले असून, त्यातील जवळपास शंभर स्वॅब ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठवण्यात येतात. आता त्यामध्ये वाढ करण्यात आली असून, 200 स्वॅब पाठवण्यात येणार आहेत. याबाबत महापालिका आणि ससून रुग्णालय प्रशानामध्ये झालेल्या चर्चेत ही माहिती देण्यात आली. महापालिकेकडून दोन ते तीन टप्प्यांत स्वॅब पाठविण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.

एकावेळी 94 नमुने तपासणी शक्‍य
ससून रुग्णालयात करोना विषाणू तपासणीसाठी असलेल्या मशीनमध्ये एकावेळी 94 नमुन्यांची तपासणी होऊ शकते. त्याचा अहवाल साधारण आठ ते दहा तासांत येतात. ही मशीन स्वयंचलित असल्यामुळे एकदा स्वॅब तपासणीसाठी लावल्यावर मध्येच थांबवता येत नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.