ठाणे – ठाण्यातील मनसेचा पदाधिकारी जमील शेख यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या राबोडी परिसरात बाईक शेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला. ही हत्या की अपघाती मृत्यू याविषयी पोलीस तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राबोडी परिसरात बाईक शेजारी जमील शेख यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणात जमील यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. तर बाईकवरून पडून अपघाती मृत्यू झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. यामुळे नेमका जमील शेख यांचा मृत्यू कसा झाला यावरून परिसरात संभ्रम आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून जमील शेख यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून जमील यांची बाईकदेखील ताब्यात घेतली असून स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींची या प्रकरणात चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.