दहा रुपयांच्या नाण्याबद्दल अद्यापही संशय कायम

नाणे न स्वीकारल्यास होवू शकते कायदेशीर कारवाई

पिंपरी – गेल्या तीन वर्षांपासून पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दहा रुपयांचे नाणे चलनातून बंद झाल्याच्या अफवा सुरुच असल्यामुळे या नाण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम अद्यापही कायम आहे. मात्र दहा रुपयांचे बंद झालेले नसून ते स्विकारण्यास अधिकृत परवानगी आहे. असे असतानाही व्यवसायिक अथवा नागरिकांनी नाणे स्विकारण्यास नकार दिल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते असा इशारा आता थेट रिझर्व्ह बॅंकेनेच दिला आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या इशाऱ्यानंतर तरी संभ्रम दूर होईल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे.

2016 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटा बंदीचा अचानक निर्णय जाहीर केला. त्यानंतर पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्या निर्णयाने सर्वत्र अनेकांची धावपळ उडाली होती. याच पार्श्‍वभूमीवर 5 रुपयाची नोट आणि 10 दहा रुपयांचे नाणे बंद झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली असल्याने सोशल मिडियातूनही या अफवेला खतपाणी मिळत होते. त्यामुळे दहा रुपयांचे नाणे नागरिक स्विकारत नव्हते. याचा सर्वाधिक फटका भाजी विक्रेते, किराणा दुकानदार, मेडिकल, खाद्य पदार्थाचे स्टॉल, दुध विक्रेत्यांना बसला होता.

महत्त्वाची बाब म्हणजे नागरिक नाणे स्विकारत नसल्याने हे विक्रेतेही 10 रुपयांचे नाणे घेण्यास नकार देत आहेत. यामुळे अनेकांना ही डोकेदुखी झाली आहे. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बॅंकेने 5 रुपयाची नोट व 10 रुपयाचे नाणे बंद झालेले नाही, असा सूचना फलक प्रत्येक बॅंकांसमोर लावले आहेत. यानंतरही नाणे न स्विकारणाऱ्यावर कलम 124 (अ) भादवी नुसार गुन्हा होवू शकतो असे स्पष्ट करण्यात आले आहे.

फोन करून करा शंकेचे निरसन
नाण्यांबाबत पसरविण्यात आलेल्या संभ्रम दूर करण्यासाठी नागरिकांनी आरबीआयच्या 14440 या क्रमांकावर कॉल केल्यास शंकेचे निरसन केले जात आहे. ज्यांना या नाण्याबाबत शंका आहे त्यांनी रिझर्व्ह बॅंकेच्या वरील क्रमांकावर माहिती घेऊन आपल्या शंकेचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here