वॉशिंग्टन : अमेरिकेत व्हिसा वर राहणाऱ्या आणि ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय विद्यार्थी आणि व्यावसायिकांना सिऍटल इथल्या फेडरल न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अमेरिकेचं जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्यासंदर्भातल्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या कार्यकारी आदेशाला न्यायालयाने अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे.
ट्रम्प हे संविधानाचा दुरुपयोग करून धोरणात्मक डावपेच खेळत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. याआधी मेरीलँड इथल्या न्यायालयानेही अशाच प्रकारचा निर्णय दिला होता. एखादे सरकार धोरणात्मक डावपेच करून संविधानाशी छेडछाड करु शकत नाही, सरकारला जन्मसिद्ध नागरिकत्वासंदर्भात नियमांत बदल करायचा असेल तर त्यासाठी सर्वप्रथम संविधानात सुधारणा करण्याच्या मार्गानेच जावे लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे.