नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला कुस्तीपट्टू विनेश फोगाट हिच्यावर फायनलआधी अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. यानंतर आता भारतासाठी पॅरालंम्पिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. टोकियो पॅरालंम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता शटलर प्रमोद भगतवर पॅरिस पॅरालम्पिकआधी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बॅडमिंटन जागतिक महासंघाने याची माहिती दिली आहे.
का करण्यात आले निलंबन?
भारताचा टोकियो पॅरालंम्पिक सुवर्णपदक विजेता शटलर प्रमोद भगतचे 18 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे तो आता पॅरिस 2024 पॅराऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकणार नाही. भगतने टोकियो पॅरा ऑलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीच्या एसएल३ क्लासमध्ये भाग घेतला होता. त्यात त्याने अंतिम फेरीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलवर मात करून सुवर्णपदक पटकावले होते. आता पॅरा ऑलिम्पिकला सुरुवात होण्याआधी भगतचे निलंबन झाल्याने भारताला मोठा धक्का बसला आहे.
प्रमोद भगतने गेल्या 12 महिन्यात तीन वेळा त्याचा पत्ता सांगितला नव्हता. त्यामुळे बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने डोपिंग प्रतिबंधक नियम व्हेअरअबाऊटच्या उल्लंघनाचा आरोप केला होता. आता या प्रकरणात त्याला निलंबित करण्यात आले आहे. प्रमोद भगतने कोर्ट ऑफ आर्बिट्रेनशन ऑफ स्पोर्टच्या निर्णयाला आव्हान दिले होते मात्र 29 जुलै रोजी त्याचे अपिल फेटाळून लावण्यात आलं. कोर्टाने दिलेला 1 मार्च 2024 चा निर्णय कायम ठेवत त्याच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली.