एकाच दिवशी पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन
पुणे – राज्यात अधिवेशन चालू असताना तसेच करोनाची साथ पसरत असताना कोणतीही पूर्वमान्यता न घेता परदेशवारी करणे पालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले. वैद्यकीय रजेचे कारण दाखवित या अधिकाऱ्यांनी ऑस्ट्रोलिया दौरा केल्याने विद्युत विभागाच्या एका अधीक्षक अभियंता महिला कर्मचाऱ्यांसह पाणी पुरवठा विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
ड्रेनेज विभागाच्या दोन अभियंत्यांनाही निलंबित करण्यात आले असून या अभियंत्यांनी 12 कोटी रुपयांची तरतूद असताना प्रत्यक्षात 24 कोटींच्या वर्क ऑर्डर दिल्या आहेत. या दोन्ही अभियंत्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.
शहरात करोनाची साथ असताना दोन आठवड्यांपूर्वी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिक्षक अभियंता मनिषा शेकटकर, कनिष्ठ अभियंता संदीप सपकाळ आणि उप अभियंता डी.एस. गायकवाड हे तीन कर्मचारी परदेशात गेले होते. या कालावधीत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने तसेच शहरात करोनाचा प्रादूर्भाव होत असल्याने मुख्यालय सोडण्यास बंदी होती, असे असतानाही हे कर्मचारी वैद्यकीय रजा घेऊन परदेश दौऱ्यावर गेले होते.
विशेष म्हणजे त्यांच्या रजाही वरिष्ठांकडून मंजूर करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे हे कर्मचारी सोमवारी पुन्हा कामावर हजर झाल्यानंतर त्यांना याबाबत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा न झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी स्पष्ट केले.
ड्रेनेज विभागातील अभियंत्यावरही कारवाई
महापालिकेच्या अंदाजपत्रकात 12 कोटींची रक्कम शिल्लक असताना, नगरसेवकांच्या आग्रहाखातर तब्बल 24 कोटींची कामे करण्याचे आदेश देणाऱ्या दोन अभियंत्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्यात उपअधीक्षक पांडुरंग लोहकरे आणि मुबारक तांबोळी या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर या दोन्ही अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे.