नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पुढील पाऊलाबाबत सस्पेन्स

* कॉंग्रेस नेत्यांना ते पक्षात कायम राहण्याबाबत आशा
* राजकीय कारकीर्द संपुष्टात आल्याची भाजपची प्रतिक्रिया
* एका पक्षाने दिली मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवण्याची ऑफर

चंडीगढ – पंजाबचे मंत्री म्हणून दिलेला राजीनामा मंजूर झाल्यानंतर आता माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्या पुढील पाऊलाबाबत मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे. सिद्धू कॉंग्रेसमध्ये कायम राहतील, अशी आशा त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे. तर, सिद्धू यांची राजकीय कारकीर्द आता संपुष्टात आल्याची प्रतिक्रिया भाजपने दिली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यात मागील काही काळापासून मतभेद निर्माण झाले. अशातच अमरिंदर यांनी मागील महिन्यात मंत्रिमंडळात फेरबदल केले. त्यानुसार, सिद्धू यांच्यासह काही मंत्र्यांच्या खात्यांमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे आणखीच नाराज झालेल्या सिद्धू यांनी नव्या ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारला नाही. त्यानंतर 15 जुलैला त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. तो अमरिंदर यांनी शनिवारी स्वीकारला.

आता सिद्धू यांच्या कॉंग्रेसमधील भवितव्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, ते कॉंग्रेसचा हात सोडणार नाहीत, असे त्या पक्षाच्या पंजाबमधील बहुतांश नेत्यांना वाटते. मात्र, मंत्रिपद सोडणे ही सिद्धू यांची चूक असल्याची परखड भूमिकाही त्यांनी मांडली.

सिद्धू यांनी 2017 मध्ये भाजपला रामराम ठोकूून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांच्याशी संबंधित घडामोडींवरून त्यांना लक्ष्य करण्याची आयतीच संधी भाजपला मिळाली आहे. पंजाबच्या राजकारणात आता सिद्धू यांना कुठले भवितव्य उरलेले नाही. त्यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात आली आहे, अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.

मात्र, पंजाबमधील लोक इन्साफ पक्षाने सिद्धू यांना आपल्या समवेत येण्याची ऑफर दिली आहे. सिद्धू यांनी लोक इन्साफमध्ये प्रवेश केल्यास त्यांना 2022 मधील विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवले जाईल, असे त्या पक्षाने म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)