पुण्यातील हेल्मेटसक्ती स्थगित

मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना


नागरिकांच्या असंतोषाची अखेर दखल

पुणे – शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली हेल्मेट सक्‍ती स्थगित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत दिल्या. तशा सूचनाही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना केल्या आहेत. या संदर्भात शहरातील आमदारांनी माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी या सूचना केल्या आहेत.

हेल्मेट न घातलेल्या दुचाकीस्वारांवर नाकाबंदी, सीसीटीव्ही अशा एक ना अनेक माध्यमांतून कारवाई करण्यात येत होती. हेल्मेटचा नियम न पाळणाऱ्यांच्या खिशाला थेट पाचशे रुपयांची कात्री लागत होती. अनेक पुणेकरांनी याबाबत मोर्चे, आंदोलने आदी कृतींतून निषेध देखील व्यक्त केला. मात्र, विरोध न जुमानता शहराच्या वाहतूक विभागाने कारवाईचा जोर कायम ठेवला होता.

“पुण्यात शहरी भागात पुणे पोलीस दलाच्या वतीने हेल्मेट सक्तीकरिता वाहन चालकांवर होणाऱ्या कडक कारवाईबाबत आणि दंड वसुलीबाबत नागरिकांमध्ये असंतोष होता. हेच लक्षात घेत आज आम्ही सर्व आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सक्ती रद्द करण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी केली. तसेच विनाहेल्मेट वाहन चालकांच्या वर पोलीस करत असलेली दंडात्मक कारवाई, परवाना ताब्यात घेणे आणि पोलिसांची अरेरावी याबाबत भूमिका मांडल्याचे मिसाळ म्हणाल्या. या निर्णयामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे,’ असे मिसाळ यांनी नमूद केले.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये झालेली कारवाई पाहता, राज्य सरकारकडून मिळालेल्या सूचनांमुळे कारवाई स्थगित करण्यात येणार का, असा सवाल करत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वाहतूक विभागाचे मौन
“हेल्मेटची कारवाई स्थगित करण्याबाबत वाहतूक विभागाला अधिकृत सूचना मिळाली नाही,’ असे म्हणत वाहतूक विभागाने याबाबत मौन बाळगले आहे. मात्र, असे असले तरी गेल्या अनेक दिवसांपासून चौकाचौकात आणि मोठ्या रस्त्यांवर सुरू असलेली सक्ती आणि दंडात्मक कारवाई शिथिल झाल्याचे दिसून येत होते. मात्र, आम्ही कारवाई सुरू ठेवल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.