गैरव्यवहार करणारा ग्रामसेवक निलंबित

माझगाव व जोगवडी ग्रामपंचायतप्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची कारवाई

भोर – भोर तालुका पंचायत समिच्या कार्यक्षेत्रात असलेल्या भाटघर धरण जलाशय भागातील ग्रामपंचायत माझगाव आणि जोगवडी ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामसेवकाने 2017-18 ते 2019 या आर्थिक वर्षात घरपट्टी, पाणीपट्टी आणि 14वा वित्त आयोगमधील निधीचा गैरकारभार करुन आर्थिक अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे ग्रामसेवक अजित खंडू कुंभार यांचे निलंबन करण्यात आल्याचे भोर तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी सांगितले.

जोगवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनाक्षी ज्ञानेश्‍वर सावंत यांच्या मागणीनुसार जोगवडी ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी भोर तालुका पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी आर. आर. राठोड व एस. व्ही. चांदगुडे यांनी करुन चौकशी अहवाल भोर तालुका पंचायत समितीकडे सादर केला आहे. या अहवालात ग्रामसेवक अजित कुंभार यांनी जोगवडी ग्रामपंचायतीची वसुल घरपट्टी, पाणीपट्टी तसेच नळ पाणीपुरवठा आणि 14वा वित्त आयोगातील मंजूर निधी यामध्ये स्वतःचे नावे सरपंचांची सही न घेता वेळोवेळी मोठ्या रकमांचा गैरवापर केला.

जोगवडी व माझगाव ग्रामपंचायतीचे दप्तर तपासणीत अनेक त्रुटी ठेवल्या असून 2017-18 व 2018-19 या अर्थिक वर्षात एकूण 83 हजार 643 रुपयांचा हिशेब दप्तरी खतावलेला असून यातील अवघे 40 हजार रुपये बॅंकेत भरणा केला आहे. उर्वरीत 43 हजार 643 रुपये रकमेचा भरणा केला नसल्याचे दप्तर तपासणीत समोर आले आहे तर 2017-18 मधील 39 हजार 939 व 2018-19 मधील 43 हजार 643 अशी एकूण 83 हजार 582 रुपयांची रक्‍कम नियम बाह्य जवळ बाळगून ग्रामसेवक अजित कुंभारने शासकीय निधीचा अपहार केल्याचे समोर आले आहे. माजगाव ग्रामपंचायतीच्या 14 वा वित्त आयोग मंजूर निधीतही 2015-16, 16-17, 17-18 मध्ये ग्रामपंचायतीस किती निधी प्राप्त झाला, शासन निर्णयानुसार पंचायत समितीकडून मंजूर व करण्यात आलेले आराखडे, नस्ती आदी तपासणी वेळी दप्तरी आढळून आल्या नसून 14 वा वित्त आयोग मधून खर्च केलेल्या रकमांचे अंदाजपत्रक, आराखडे, मोजमाप पुस्तीका, प्रमाणके दप्तर तपासणीवेळी उपलब्ध करुन न देता विहित कार्यपद्धतीचा आवलंब न करता खर्च केल्याचे निष्पन्न झाले आहे. सौर दिवे, फॉंगिंग मशिन, सिमेंट बाकडी, सोलर सिस्टीम सौरदिवे, नळपाणी पुरवठा दुरुस्ती, कर्मचारी पगारआदिंचा 9 लाख 69 हजार 150 रुपयांचे खर्चांचा किर्दित हिशेब दाखवलेला नसून या सर्व तपासणी अहवाला वरुन ग्रामसेवक अजित खंडू कुंभार याचे दि.1 जून 2019 पासून निलंबन करण्यात आले आहे.

माझगाव व जोगवडी या दोनही ग्रामपंचायतींचा पदभार ग्रामसेवक एस. जी. वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आला असल्याचे गटविकास अधिकारी संतोष हराळे यांनी सांगितले. या कारवाईची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी आधिकारी (ग्रामपंचायत) यांना देण्यात आली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×