नगर -करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनता त्रस्त असताना जबाबदार अधिकारी यांनी मस्तवालपणे आपल्या कर्तव्याचे पालन न करता शहराला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. त्यामुळे आरोग्य अधिकारी, अग्निशमन विभाग प्रमुख व कर्मचारीला तातडीने निलंबीत करण्याची मागणी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी छावाच्या महिला जिल्हाध्यक्षा सुरेखा सांगळे, आशा गायकवाड, सुमेता शेजुळ, सुरेखा साळी, विलास कराळे आदी उपस्थित होते.
बोल्हेगाव येथील 14 वर्षीय शाळकरी मुलाच्या घरात घुसून मद्य प्राशन करुन, महापालिकेचे अरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे, अग्निशमन विभाग प्रमुख शंकर मिसाळ, कर्मचारी बाळू घाटविसावे यांनी मारहाण करुन गच्ची वरुन फेकून देण्याचा प्रयत्न केला. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना 13 जून रोजी घडली. याबाबत पिडीत मुलाच्या फिर्यादीवरुन तिघांविरुध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांना पदावरुन तातडीने निलंबीत करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.