राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी; आयुक्तांच्या मनमानीमुळे पैसे अडकले
पिंपरी -“येस’ बॅंक अडचणीत आल्याचे 4 डिसेंबर रोजीच निदर्शनास आणून देत या बॅंकेतील पैसे तात्काळ काढून घ्या, अशी मागणी केल्यानंतरही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बॅंकेतील पैसे काढून न घेतल्यामुळेच महापालिकेची 984 कोटी रुपयांची रक्कम निर्बंध लादलेल्या “येस’ बॅंकेत अडकली आहे. हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असून याला आयुक्तच जबाबदार असल्याने त्यांना निलंबित करून त्यांची “इडी’मार्फत तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे तब्बल 984 कोटी रुपये येस बॅंकेत अडकल्यानंतर शहरात खळबळ उडाली. यानंतर दुपारी महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत या संपूर्ण प्रकाराला सत्ताधारी भाजपाचे पदाधिकारी, आयुक्त श्रावण हर्डीकर आणि तत्कालीन लेखाधिकारी राजेश लांडे हे जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आला. या पत्रकार परिषदेला वाघेरे, काटे यांच्यासोबतच महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे उपस्थित होते.
पुढे बोलताना संजोग वाघेरे म्हणाले, 4 डिसेंबर 2019 रोजी आपण स्वतः आयुक्तांना लेखी पत्र दिले होते. या पत्रामध्ये येस बॅंकेविषयी सविस्तर माहिती दिली होती. संबंधित बॅंक ही सहाशे कोटी रुपयांच्या नुकसानीमध्ये असून सदरची बॅंक अडचणीत येण्यापूर्वी महापालिकेने या बॅंकेत गुंतविलेली संपूर्ण रक्कम काढून घ्यावी, याबाबत विनंती केली होती. सदर बॅंकेत एकही खाते ठेवू नये असेही आपण आग्रहाने मांडले होते. मात्र या पत्राकडे आयुक्तांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वेळीच रक्कम काढली असती तर आजची वेळ आली नसती.
मात्र आयुक्त हर्डीकर आणि सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी हा स्कॅम केला आहे. ज्या पदाधिकाऱ्यांच्या काळात बॅंकेत खाती उघडण्यात आली त्या पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांवर व तत्कालीन लेखाधिकाऱ्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात यावी, रिझर्व्ह बॅंक, इडी व राज्य शासनाने लक्ष घालून सर्व खरी माहिती समोर आणावी, यासाठी आम्ही रीतसर तक्रार करणार असल्याचेही वाघेरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात येणार असून आयुक्तांना तात्काळ निलंबित करण्याची मागणीही करणार असल्याचे वाघेरे म्हणाले.
आयुक्तांवर कारवाई करा – कलाटे
महापालिकेच्या ठेवीचे 833 कोटी रुपये व व्याजापोटी 151 कोटी असे एकूण 984 कोटी रुपये अडचणीत आणणाऱ्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. “येस’ बॅंकेवर निर्बंध लादल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली. “येस’ बॅंकेत खाती कोणाच्या सांगण्यावरून उघडली, कराची रक्कम जमा करण्यासाठी काढण्यात आलेली निविदा प्रक्रिया, संबंधित बॅंकेने ही रक्कम जमा करण्यासाठी नियुक्त केलेली खासगी एजन्सी तसेच करसंकलनामध्ये करण्यात आलेला अपहार या संपूर्ण प्रकाराची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही कलाटे यांनी सांगितले.